छत्रपती संभाजीनगर – दि. १८ –
शिक्षक औपचारिक शिक्षणासोबत अंतकरणात करुणा घेऊन जगत असेल तर समाजात सेवाभाव आपोआप रुजला जातो. जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्कारा’ला उत्तर देताना ते बोलत होते.
जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चंद्रदेव कवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत, डॉ. प्रल्हाद लुलेकर, दगडू लोमटे, प्रा. सुरेश पुरी, विजयमाला पुरी, प्रा. सुजाताताई गोरे यांची उपस्थिती होती.
देशात शेतकरी विरोधी कायदे अस्तित्वात आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय डबघाईला आला. यातून शेतकरी आत्महत्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. महात्मा फुलेंच्या विचाराचे वारस देशात तयार झाले नाहीत, त्यामुळेच शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. आजचा हा सोहळा म्हणजे करुणा आणि कृतज्ञतेचा आहे. प्रा. सुरेश पुरी यांचे कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्यामुळे आज देशाच्या विविध भागात अनेक विद्यार्थी कार्यरत झाले आहेत, असेही अमर हबीब म्हणाले.
विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना हक्काचा आधार म्हणजे प्रा. पुरी यांचे घर होते. केवळ औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांचे आयुष्य घडविले. त्यांच्या जगण्याला आकार दिला. अशाच सेवाभावातून समाजाची उभारणी होत असते. प्रा. सुरेश पुरी यांचे कार्य समाज बदलाचे आहे, असे गौरवोद््गार डॉ. लुलेकर यांनी काढले.
ज्येष्ठ साहित्यिक दगडू लोमटे यांनीही मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. चंद्रदेव कवडे यांनी केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन डॉ. राजू सोनवणे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय गायकवाड यांनी केले तर आभार वैजनाथ वाघमारे यांनी मानले. यावेळी प्रसिद्ध लेखक शाहू पाटोळे, प्रकाशक कुंडलिक अतकरे, वासुदेव मुलाटे, माहिती सहसंचालक श्याम टरके, ग्रंथपाल पांडुरंग अडसुळे, इंजिनिअर बळीराम किनाळकर, प्रेरणा दळवी, डॉ. हसन इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






