गेवराई – बीड :
: मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या पायथ्याला उजवा कालवा अस्तारीकरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, शून्य ते एकशे बत्तीस किलोमीटर पर्यंतच्या उजव्या कालव्याला नवी पालवी फुटली आहे. दरम्यान, सदरील काम शेवटच्या टप्प्यात असून, नवीन अस्तारीकरणाने कालवा दुथडी भरून वाहू लागल्याने, गोरगरीब शेतकर्यांच्या शेतीला चांगला फायदा होऊ लागला आहे.
पैठण जि. संभाजीनगर येथील नाथसागराच्या पायथ्यापासून 0 ते 132 किलोमीटर अंतरावर असलेल्या उजव्या कालव्याच्या अस्तारीकरणा साठी राज्य
शासनाने ५२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दिला होता. सदरील काम सुरू झाले असून, अस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
उजव्या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी
गळती थांबली असून वहनक्षमतेत दुप्पटीने वाढ झाली आहे. जायकवाडी प्रकल्पापासून शेवटच्या टोकापर्यंत उजवा कालव्याची लांबी १३२ किमी आहे. या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, बीड , अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ हजार ६८२ हेक्टर सिंचन होते. हा कालवा माजलगाव जलाशयापर्यंत २९९ द.ल.घ.मी. पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जातो. सन १९८४ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले होते. गेल्या काही वर्षांपासून
कालव्याच्या दुरवस्थेमुळे वहन क्षमतेला अडचणी येत होत्या. त्यामुळे, सन २०२३ मध्ये राज्यसरकारने जायकवाडी प्रकल्प टप्पा २ ला मंजुरी दिली होती. कालव्यावर १३२ किलोमीटर लांबीच्या कालव्याचे अस्तरीकरण आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलसंपदा विभागाने मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली. आज १३२ कि.मी. पैकी १०५ किमी (८०%) कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती परभणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी दिली आहे.
या कामामुळे चालू उन्हाळी हंगाममध्ये सिंचन आवर्तनामध्ये ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे. प्रकल्पाच्या स्थापनेपासून प्रथमच, पैठण उजव्या कालव्यातून १६०० क्युसेस एवढ्या प्रचंड क्षमतेने विसर्ग यशस्वीरीत्या चालू आहे. यापूर्वी एवढा विसर्ग माजलगाव धरणामध्ये कधीच पोहोचला नाही. चालू हंगामध्ये अंतिम टप्प्यात आणखी पूर्ण विसर्ग क्षमतेने २२५० क्युसेस करण्याचे नियोजन ‘कडा’ करीत आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता प्रसाद लांब आणि अन्य अधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने हे शक्य झाल्याचे दिसून येते.
◾
क्षमता वाढली
कालव्याचे नव्याने अस्तरीकरण केल्याने कालव्याची पाणी गळती बंद झाली. शिवाय पाण्याचा अपव्यय कमी होऊन कालव्याची क्षमता वाढली आहे. पाणी वितरण अधिक प्रभावी झाले आहे. उपसा परवानगीचे प्रमाण वाढलेले आहे.
◾
0 ते 132 किलोमीटर अंतरावर असलेल्या उजव्या कालव्याचे अस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सदरील काम शेवटच्या टप्प्यात आहे. कामाच्या संदर्भात संबंधित कंत्राटदाराने दर्जा राखावा, यासाठी जलसंपदा विभाग,परभणी कार्यालयाने वरिष्ठांचे आदेशानुसार माॅनेटरींग केले आहे.पूर्वी उजव्या कालव्याद्वारे सिंचन आवर्तन २० ते २२ दिवस चालवावे लागत होते. कालव्याच्या दुरुस्तीमुळे, आवर्तन केवळ १३ ते १४ दिवसांत पूर्ण होऊ लागले आहे. त्यामुळे,पाण्याची मोठी बचत झाली आहे. माजलगाव धरणापर्यंत पहिल्यांदाच एवढा मोठा विसर्ग पोहचू शकला. कालव्यातील अस्तरीकरणामुळे पाण्याचा अपव्यय कमी झाला असून, कार्यक्षमतेत चांगली वाढ झाली आहे.
प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, परभणी






