गेवराई – बीड : गढी ता. गेवराई जवळच्या उतारावर, राष्ट्रीय
महामार्गाच्या दुभाजकात अडकून पडलेली गाडी काढत असताना, बीड कडून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने, झालेल्या अपघातात सहा तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार ता. 26 रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे.
घटनेत, गेवराई तालुक्यातील सहा तरूण जागीच ठार झालेत. भरधाव वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर गाडी काढण्यासाठी
उभ्या असलेल्या दहा – बारा तरूणांना जोराची धडक दिली. या अपघातात सहाजण ठार झालेत. दोन जखमी असून, नशीबाने तीघे जण वाचले आहेत. आयशरचा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला आहे. जखमींवर, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाता नंतर, गेवराई शहरात शोककळा पसरली. मृत्यू झालेल्या युवकांचे मृतदेह सरकार दवाखान्यात आणण्यात आले होते. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर, तिन युवकांवर गेवराई शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुंदके, आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे ही पाणावले. सामाजिक कार्यात सक्रिय राहून, घर प्रपंच सांभाळून काम करणाऱ्या सहा तरूणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली असून, गेवराई तालुक्यावर [ बीड ] शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पाडळसिंगी टोलनाका ते गढी पर्यंत ,राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुच्या असलेल्या लाईट बंद होत्या. रस्त्यावर अंधुक प्रकाश होता. त्यामुळे, या दुर्दैवी अपघाताला टोल नाका प्रशासन जबाबदार आहे. पाडळसिंगी ते गढी पर्यंत च्या रस्त्यावर व पुलावर दहा-पंधरा ठिकाणी खड्डे पडलेत. तिथे पाणी साचल्याने, वाहन धारकाला अंदाज येत नाही. टोल नाका प्रशासन डोळेझाक करून, कोटी रूपयाची वसूली करून, मलिदा चाटण्यात मश्गुल आहेत. या अपघाताची संपूर्ण जबाबदारी टोल नाका प्रशासनाची आहे. संस्था प्रमुखावर
मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून, टोल नाका व्यवस्थापकाला अटक करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
सोमवार ता. 26 रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे दहा – बारा सहकारी मित्र सोमवारी ता. 26 मे. च्या रात्री उशिरा घटनास्थळी आले. दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळासाहेब आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर, सचिन नन्नवरे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एपीआय संतोष जंजाळ उशिरापर्यंत सरकारी दवाखान्यात हजर होते.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






