गेवराई -बीड : ट्रॅक्टर घेण्यासाठी,तुझ्या आई-वडीलांकडून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत सासरकडून होणारी सतत मारहाण आणि शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गयाबाई लालचंद शेळके (रा. वानंदवाडी, ता. शिरूर) या विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील घटना 11 जून रोजी शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली. दरम्यान, मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहितेचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यासह मामा विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
गयाबाई हिचा विवाह 15 वर्षांपूर्वी झाला होता. सुरूवातीचे काही दिवस चांगले नांदविले. त्यानंतर, सासरच्या लोकांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून 7 लाख रुपये आणावेत म्हणून पती लालचंद शेळके, सासरा आश्रुबा शेळके, सासू संगीता शेळके, नणंद अलकाबाई परमेश्वर भातखणे, मामा संदीप मोरे नेहमीच शिविगाळ, मारहाण करीत होते. या त्रासाला कंटाळून गयाबाई सहा वर्ष माहेरी राहील्या. सासरच्या लोकांना समजावून सांगितले. त्यानंतर सासरच्या लोकांनी मागील आठ महिन्यांपासून गयाबाईस नांदावयास नेले होते. परंतू , गयाबाईचा छळ सुरूच होता. या त्रासाला कंटाळून 11 जून रोजी सकाळी गयाबाई हिने पिंपरीचा मळा येथील शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यानंतर , तिला उपचारासाठी बीड येथील खासगी रुग्णालयात नेले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गयाबाईचे वडील रावसाहेब भाऊसाहेब (रा. वरंगळवाडी, ता. शिरूर कासार) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस ) नुसार 108,85 नुसार चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






