गेवराई – बीड : पर्यावरण संवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा, हा महत्त्वपूर्ण संदेश आणि मुखी विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेली बुलढाण्याची सायकल वारी गुरुवार ता. 19 रोजी सकाळी नऊ वाजता गेवराई [ जि.बीड ] शहरात आली. शहरातील नागरिकांनी वारीचे स्वागत केले आहे. विठू तुझा लळा लागला. असा सूर सायकल वारीतून उमटला आहे.
18 जून रोजी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या दिंड्या पंढरपुरच्या दिशेने पायी निघाल्या आहेत. मानाच्या दिंड्याने प्रस्थान करताच, वारकरी विठू नामाचा गजर करीत, चालू लागल्याचे भक्तीमय चित्र दिसून येत आहे.
सायकलवर प्रवास करून, निघालेली सायकल वारी पंढरपुरात पोहचणार आहे. गेवराई शहरात आलेल्या बुलढाण्याच्या सायकल वारीने लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सायकलवर आलेले वीस हजार वारकरी एकत्र दिसणार आहेत.
हिरव्या रंगाचे टी-शर्ट ,हेल्मेट घालून आलेल्या वारकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. दररोज तीस-पस्तीस किलोमीटर अंतर पार करून, चौथ्या दिवशी सदरील “वारी” विठ्ठलाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे.
ठरलेल्या ठिकाणी सायकल वारीचा रिंगण सोहळा पार पडणार आहे. या संदर्भात, बुलढाण्यातून आलेले दिपक कॅवल, विष्णू गाडे यांनी सांगितले की, विठ्ठल दर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून विठ्ठल भक्त सायकलवर प्रवास करून वारीला निघाले आहेत. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, इंधन बचतीचा संदेश देत, आम्ही पंढरपुरात पोहचणार आहोत. बुलढाण्यातून निघाल्यानंतर सायकल वारीचे जागोजागी स्वागत झाले आहे. आमचा चमू वाटेत योग्य ठिकाणी वृक्षारोपण करून, वारी मार्गस्थ होते. गावकऱ्यांशी संवाद साधून, झाडांचे , पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आहोत. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सायकलवर आलेले वारकरी चौथ्या दिवशी पंढरपुरात पोहचल्यावर, सायकल वारीचा रिंगण सोहळा पार पडणार असून, जवळपास वीस हजार वारकऱ्यांचे रिंगण लक्षवेधी राहणार आहे. असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते विश्वास गाडे यांनी व्यक्त केला आहे.






