गेवराई – बी : : गेवराई तहसील कार्यालयात भंगार लिलाव प्रक्रियेत तहसीलदार संदीप खोमणे यांनी, संबंधित एजन्सीला हाताशी धरून; भंगार घोटाळा केल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक सय्यद एजाज इफ्तेखार अहमद यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून, तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल असून, निवेदनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जप्त वाहनांच्या भंगार लिलावाचे आदेश दिले होते. परंतु , तहसीलदार संदीप खोमणे यांनी लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती स्थापन करून तहसिलदार खोमणे यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तक्रारीनुसार, लिलावाच्या तारखा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या आणि 29 मे 2025 रोजी झालेल्या लिलावात गंभीर अनियमितता आढळल्या. 7 ते 8 जणांनी एका व्यक्तीच्या नावाने अर्ज सादर केले आणि बोलीसाठी चक्क दुसऱ्या व्यक्तींना बसवले गेले. याशिवाय, एकाच व्यक्तीने दोन अर्ज सादर करून दोन जणांनी लिलावात सहभाग घेऊन प्रशासनाची फसवणूक केली. लिलावादरम्यान संगनमताची चर्चा तहसील कार्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तक्रारदाराने लिलाव जाहीर प्रगटणीत नमूद 10,000 रुपये ठेवीच्या नियमांचे उल्लंघन करत खोमणे यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचा आरोप केला आहे.माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी मागणी केली आहे की, तहसीलदार खोमणे यांच्यावर तात्काळ चौकशी समिती स्थापन करून लिलाव दरम्यानचे कॅमेरा चित्रीकरण आणि दफ्तर तपासावे. तसेच, हा लिलाव रद्द करून उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर पुन्हा घ्यावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत तहसिलदार खोमणे यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तक्रारदाराने चेतावणी दिली आहे की, 2 जुलै 2025 पर्यंत कारवाई न झाल्यास 3 जुलैपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करेल आणि प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नेईल. या घोटाळ्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





