२००४-०५ साली पहिल्यांदा संदीप भेटला. एमजीएममध्ये मी कामाला होतो. ते दैनिक सांजवार्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. तो काळ प्रिंट मीडियाचा वैभवशाली होता. आमच्याकडे सर्व दैनिक येत. बातमी, लेखांवर चर्चा होत. एका दिवशी अचानक कॅम्पसमध्ये संदीप काळे आले. मी म्हणालो, ‘बातमी सुंदर झाली.’
सदा हसतमुख असलेल्या पत्रकाराने आणखी हसरं होत विचारलं, ‘बातमीत नेमकं काय वाटलं ?’ मी आपला फाटक्या तोंडाचा बिनधास्त बोललो. प्रत्यक्ष मी माध्यमात काम केलेले होते. त्यावेळी खाजगी वृत्तवाहिन्या आपले जाळे वेगाने विस्तारत होत्या. आतापर्यंत वाचूनच हसायचं आणि वाचूनच रडायचं हा काळ सुरू होता. ते थांबून बघून हसायचं आणि बघूनच रडायचा काळ सुरू झाला. त्यामुळे आजची बातमी आजच बघायला मिळू लागली आणि वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढला. प्रत्येक जिल्ह्यात एक प्रतिनिधी नेमला गेला. त्यात आयबीएन लोकमतचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काळेंनी काम सुरू केले. अधूनमधून मी नांदेडला आल्यावर लोकमत कार्यालयात जात असे. त्यावेळी काळेंची अपघाती भेट होत. सहज प्रतिक्रिया देत, ‘अमूक बातमी छान होती. स्टोरीही छान झाली होती बरं.’ मग काळे सर भावूक होऊन विचारत, ‘खरंच छान झाली होती. त्यात कमी काही पडलं होतं ?’ त्यावेळी मला त्यांच्यात पत्रकारितेतील साने गुरूजी वाटायचा. इतका विनयशील माणूस माध्यमात अपवादानेच बघायला मिळाला.
सकाळ पेपर्सच्या वतीने ‘यीन’ उपक्रम सुरू झाला. काळेंनी तिथे आपल्या कामाची दखलपात्र छाप पाडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली. सातत्यपूर्ण लेखन सुरू झाले. महाराष्ट्रातील एकही जिल्हा राहिला नसेल तिथे काळेंचं पाऊल पडले नसेल. प्रत्येक कार्यक्रमाचं नीटपणे नियोजन ही सर्वात मोठी जमेची बाजू होती. तीच त्यांच्या कामातून ठळकपणे लोकांची अपेक्षा वाढवणारी ठरली. मग दर आठवड्याला सुरू झालेलं ‘भ्रमंती लाईव्ह’ मानवी जीवनातील सुख -दु:खाला जगभरात उजागर करू लागली. त्यातून अनेक सेवाभावी व्यक्तिमत्त्व, अडीअडचणीला लाथ मारून संघर्ष करत स्वतःसह इतरांसाठी प्रेरणा देणारी माणसं संदीप काळे यांच्या लेखणीचे विषय झाले. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाल्याच्या प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, हेमलकसा, आनंदवनातील आमटे कुटुंब, प्रेमाने घायाळ झालेला जखमी ध्येयवादी मूर्तीकार (शिल्पकार), रस्त्यावरची माणसं, आरोग्य सेवक, लोकचळवळीतील दानशूर असे अनेक चेहरे लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न काळेंच्या पत्रकारितेनं केले आहे. त्यामुळे लोकजीवनात नकळतच संदीप काळे नावाची छाप कोरली गेली आहे. बघता बघता पंच्याहत्तर पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले. काही पुस्तकांवर चित्रपट आणि नाट्यसंहिता तयार झाल्या. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या देशभरातील कार्यरत असलेल्या संपादक संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा देदीप्यमान विस्तार झाला आहे.
राज्यासह देशातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी दांडगा संपर्क, ‘ऑल इज वेल’, ‘मु. पो. आई’ ही दहा, वीस आवृत्ती हातोहात संपल्या. अनेक विद्यापीठांनी या पुस्तकांना आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले असतानाही पाटनूर ता. हदगाव जि. नांदेड येथीलच संदीप काळे मला आजही बघायला मिळतो. त्यामुळे मला कायम वाटत आलं आहे की, अशी माणसं समाज काहीअंशी घडवू शकतात. कारण पत्रकाच्या बातम्या करणाऱ्यालाही मी पत्रकार आहे असं वाटतं, हे मी जवळून अनुभवलं आहे. पण इतकी दीर्घ लेखमाला सुरू आहे. सातत्यपूर्ण भवतालात दिसणारं दु:ख दूर होऊन माणसं नव्या जोमाने जगायला सिद्ध व्हावीत हाच संदेश काळेंच्या लेखनाचा आहे. यातून समाजातील कितीतरी क्षेत्राशी निगडीत असतानाही मी कोणीतरी वेगळा आहे, हा आविर्भाव कधीच त्यांच्यात जाणवत नाही. मागच्या चार पाच वर्षांत बऱ्याच उलथापालथी महाराष्ट्रात झाल्या. कधी ज्याच्या मनात जात नव्हती त्याच्याही मनात आरपार जात कोरली गेली. त्यामुळे गावातील उद्ध्वस्त झालेला एकोपा पाहून संदीपमधील संवेदनशील माणूस, लेखक आणि पत्रकार हळहळला. या जात जाणिवांच्या संघर्षात कोणीच भूमिका घेत नव्हते. अशा वादळी काळात संदीप काळे नावाचा लोकपत्रकार कोणत्याही परिणामाची भीती न बाळगता फेसबुकवर ‘इतका जातीयवाद बरा नाही’ असं ठामपणे सांगतो. त्यामुळे आत्मकेंद्री समुहाला झोपेतून जागं करणारं कोणीतरी आहे, असं मनोमन वाटतं राहतं. मानवी मनाची साठवून ठेवण्याची हाव काही केल्या कमी होत नाही. मात्र संदीप काळे यांनी दहा मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यासोबतच ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी फेलोशिप जाहीर केली. यातून एक गोष्ट लक्षात येते ती अशी, आपण मानवी समुदायात जन्माला आलो, त्यांच्यासोबत वावरतो, कुणाच्या ना कुणाच्या कष्टाचा आपल्या आयुष्याला आधार आहे. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे, हीच नितळ भावना काळे यांची आहे.
मराठवाड्यातील लोकं आळशी, वेळेला महत्त्व देत नाहीत. जगाच्या वेगात ते सामावत नाहीत. कार्यक्रमं वेळेवर सुरू होत नाहीत. हा सूर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काळेंनी या म्हणण्याला खोटं ठरवले आहे. आतापर्यंत त्यांनी घेतलेली सर्व कार्यक्रम वेळेत सुरू झाली आहेत. विशेषतः कार्यक्रमात ऐनवेळी कोणतीही धावपळ होऊ न देता योग्य नियोजन करण्याचं कसब पाहता नवल वाटतं, ही निर्णयक्षमता कुठून येत असेल? बिनचुकपणे ती वेळ साधणं फार महत्त्वाचे असते आणि तीच बाब त्यांच्या नियोजनातून साधली जाते. परवा नुकताच जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकपत्रकारिता पुरस्काराचा वितरण सोहळा यशस्वीरित्या पार पडला. तो पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं बहुतांश श्रेय संदीप काळे यांच्या नियोजनाला जाते. दोन वर्षांपूर्वी एक टेक्स्ट मेसेज केला. ‘उद्या घरभरणी आहे. यावं लागेल.’ ‘हो येईल.’ आणि मेरा दिलखुलास भाई सहजपणे अवतरला. माझ्या सतराव्या शतकातील अवताराला बघून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता की, संदीप काळे सर इथे कसे?
असा हा सहज, सुंदर आणि मोकळ्या मनाचा मेरा बडा भाई बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचा मानकरी ठरला, याचा आनंद काही औरच!
मेरे भाई का काम दिल लगा के चालू आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात ‘शॉट’ झालेल्या ब्लबांकडून उजेड पाडला जात आहे, मात्र माझा भाऊ संदीप काळे ‘पाचशे व्होल्टेजचा मर्क्युरी’ आहे. तेव्हा येणाऱ्या काळात प्रकाश पेरताना दिशादर्शक उजेड पाडेलच, याचा मला विश्वास आहे. त्या कामाला साहित्य अकादमी, पद्मश्री मिळो, हीच सदिच्छा!
वैजनाथ वाघमारे
शब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन)
छत्रपती संभाजी नगर
मो – 8637785963/7758941621






