बीड – स्वतःच्या मालकीच्या
कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा वर्षभरापासून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड परिसरात शनिवार ता. 28 रोजी मध्यरात्री अटक केल्याची माहिती आहे.
सदरील विद्यार्थिनीने आरोपी विजय पवार प्रशांत खाटोकर या दोघांनी आपला वर्षभर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती. या मुलीला वर्षभरापासून हे दोघे जाणीवपूर्वक त्रास देत होते. तिच्या शरीराला हात लावून, कपडे काढून फोटो काढत होते. तक्रारीनंतर बीड जिल्ह्य़ात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त होत आहे.
हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह, इतर पोलीस ठाण्याचे सातपथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.
सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे लोक यांनी उमाकिरण शैक्षणिक संकुल समोर आंदोलन करून, आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. आरोपी अटक न झाल्यास सोमवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रशांत खाटोकर हा धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विजय पवार हा देखील नगरहून बीड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना जेरबंद केले आहे.






