बीडच्या घटनेने पून्हा एकदा मराठवाडा हादरला आहे. आधीच बीड बदनाम झालय. कुठेही गेलं की, बीड चा म्हटलं म्हणजे, कपाळावर आठ्या पाडून लोक संशयाने पाहतात. याचा अर्थ, सब माहोल खराब आहे. असं अजिबात नाही. परंतु , समाजात नकारात्मकता वाढत चालली आहे. हे वास्तव आहे. बीड शहरात, शिकवणीला येणाऱ्या मुलीवर जो प्रसंग आला. त्या प्रसंगाने, घटनेने त्या मुलीला, तिच्या कुटूंबाला किती वेदना झाल्यात. याचा विचार कुणी करणार आहे की नाही ? नुसतेच कागदी घोडे नाचवून पुढे जाणार आहोत का आपण ?
आरोपी विजय पवार आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा हाच एकमेव उपाय आणि तसा थेट संदेश जाईल, या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणेकडून अपेक्षा आहे. शिक्षकांच्या कृत्याने गुरू-शिष्याच्या नात्यालाच काळीमा फासली आहे. कोणावर विश्वास ठेवावा ? असा यक्ष प्रश्न उभा राहीला आहे. खर म्हणजे, आपला मुलगा-मुलगी ज्या शाळेत जातो. केवळ विद्यार्थी शाळेत जातोय, एवढेच नाही. तर, पालकांना
त्या शाळा – महाविद्यालया विषयी विश्वासाची एक भावना असते. त्या भावनेलाच धक्का बसला आहे. पवारची विकृती, मुक्या जनावरांना मागे टाकणारी ठरली आहे. या विकृतीने शिक्षणा सारख्या पवित्र नात्याला कलंक लागला आहे. हे शिक्षणातले शिणकिडे आहेत. निरागस मुलींच्या भावनेशी खेळण्याचा, तिला मानसिक, भावनिकदृष्ट्या टाॅर्चर करून, असहाय्यतेचा फायदा घेतला गेला. वर्षभरापासून मुलीवर अत्याचार केलेत. या घटनेने,
समाजात प्रचंड चीड आहे. बीडच्या अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलीत.
महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या सगळ्या क्लासेस च्या संदर्भात सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. कोचिंग क्लासेसचे ऑडिट झाले पाहिजे. गोपनीय पद्धतीने आवाहन करून, क्लासेसच्या कारभाराचा पंचनामा झाला पाहिजे. काळ सोकावतोय का ? हे शोधण्याची गरज आहे. ती वेळ कुणावरही येऊ शकते. जर का, पवारच्या कृत्यांवर पांघरूण घातले जाणार असेल तर, काळ माफ करणार नाही. पवार च्या धाडसा मागे कोण आहे. तो एवढा मस्तवाल कसा वागू शकला. त्याचा माज जिरवायची आवश्यकता आहे.
बीड जिल्ह्य़ातल्या प्रत्येक तालुक्यात, शहरात शिकवणुकीचे मोठ मोठे “हब” तयार झालेत. कोटीची उलाढाल आहे. पालक शाळेत वेगळी फिस [ शुल्क ] भरतो. त्या शिवाय, खाजगी कोचिंग क्लासेसची भरमसाठ फिस देऊन, मुला-मुलींच्या भवितव्याचा विचार करतो. त्यांच्या लेखी पैशाला किंमत नसते. मुलांचे हित लक्षात घेऊन क्लासेस लावले जातात. क्लास आणि शाळा, असे उलटे समीकरण तयार झाले आहे. त्याचे घातक परिणाम दिसू लागलेत.
एवढे करून ही, मुलं-मुली सुरक्षित नाहीत. ज्यांनी रक्षक म्हणून कवचकुंडल उभे करायचे. तेच भाडखाऊ वृत्तीचे शिक्षक गैरवर्तन करत असतील तर ? न्याय मागायचा तरी कुणाकडे ?
कोचिंग क्लासेस
च्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जाते. हे उघड सत्य आहे. शाळेतला शिक्षक कोचिंग क्लासेसचा संचालक असतो. त्यांची टोळी तयार होते. त्यातून, विद्यार्थ्यांनी कुठे क्लास लावायचा. त्यांना कसे प्रवृत्त करायचे. हे सगळे ठरवून केले जाते.
उदाहरण म्हणून, गेवराई जि.बीड येथे पन्नास क्लासेस आहेत. बहुतेक क्लासेसचे संचालक शिक्षक आहेत. या धंद्यात
कोटीची उलाढाल होऊ लागली आहे. कोचिंग क्लासेस ची फिस, पुस्तके सुद्धा त्यांचीच. त्याचे वेगळे पैसे वसूल केले जातात. काहींनी क्लासेसचा धंदा मांडलाय. बर, या कोचिंग क्लासेसला कोणतेही नियम नाहीत. सरकारची कोणतीही यंत्रणा लक्ष देत नाही. जमा खर्चाचा हिशोब नाही. काॅलेजात विद्यार्थी कुठे राहीलेत. फक्त ॲडमिशन आहेत. विद्यार्थी ॲडमिशन घेऊन, बीड, संभाजीनगर, लातुरला कोचिंग क्लासेस हजेरी लावतो. त्यामुळे, कोचिंग क्लासेसला सोन्याचे दिवस आलेत. सरकार झोपलय.
टिचर, शिक्षक, गुरुजी, मास्तर आणि सर, या शब्दांना वेगळा अर्थ आहे. शिक्षणाच्या पाऊलवाटेवर चालत असताना ; आयुष्यात येतो तो गुरू…! टिचर शब्दातल्या इंग्रजी अक्षरात “सी” नावाचे मुळाक्षर आहे. सी म्हणजे कॅरेक्टर..! चारित्र्यावर काजळी येऊ लागली आहे. पैसा आल्याने हा माज आलाय, येतो. मुला-मुलींना, गुड टच,
बॅड टच समजतो, कळतो. एखादे वेळी लक्ष दिले जात नाही. ते आपले गुरू आहेत. त्यांच्या मनात “ती” भावना नसेल. उगीच कशाला संशय घ्यायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट. एखाद्या हरामखोर शिक्षकाची कृती
लक्षात आली तरी, घरचे काय म्हणतील ? आपल्यालाच बोल लावला तर..! या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मात्र, काही मुली, मुले धाडसाने आई-वडीलांना थेटपणाने सांगतात, आणि हेच खरे असते.
शिक्षकाने विद्यार्थ्यांवर संस्कार करून, त्यांना माणूस म्हणून उभे करायचे आहे. हे शिक्षकाचे दायित्व आहे. त्याची नैतिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीलाच तो विसरला आहे. कामातुराणां भयं ना लज्जा, हे संस्कृत सुभाषित आहे. वासनांध झालेल्या माणसांना कशाची भिती नसते. त्यातला हा प्रकार आहे.
पवाराने पार कंबरेचे सोडून डोक्याला बांधले. समाजाचा राहुदे, किमान कुटुंबाचा विचार करायचा.
पवारच्या मेंदुवर किडे जमा झालेत. कायद्याने न्याय करावा, ही अपेक्षा आहे. नियती सोडणार नाही. इतिहास साक्षी आहे. पवार आणि त्याच्या सर्व साथीदारांना किंमत चुकवावीच लागेल. समाजाला निरोगी ठेवण्याचे कर्तव्य पार पाहणार्यांना अधिक सजग होण्याची गरज आहे. विश्वासा पेक्षा संशय बरा..! या अर्थाने, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या धुरिणांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे, मस्तवाल सुटलेले झारीतले शुक्राचार्य वठणीवर येतील.
सुभाष सुतार ,
पत्रकार गेवराई-बीड






