माणूस बदलतो, काळानुसार, हळूहळू, कुणालाही न कळता.
आतल्या आत कुठे हरवून जातो कधी जबाबदाऱ्या पेलताना,
तर कधी नात्यांच्या साखळदंडात अडकून…!
माझ्याही आयुष्यात असा एक काळ आला होता. तो दिवस आजही आठवला की, अंगावर रोमांच उभे राहतात.
माझ्या लाडक्या पुतणीचं लग्न ठरलं. घरात लगीनघाई, तयारी, पाहुणे, लग्नासाठी खरेदी आदींची तयारी सुरू होती. सगळं काही आनंदानं भरून आलं होतं.
पण या सगळ्या धावपळीत
माझे पती अमोल, ते सतत धावपळ करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण डोळ्यांखालची काळसर वर्तुळं बरच काही सांगून जात होती. थकवा त्यांच अंग झिजवत होता. पण ते थांबले नाहीत. माझ्या लेकीच्या (पुतणीच्या) लग्नात काही कमी पडू नये, यासाठी त्यांनी स्वतःला हरवून टाकलं होतं. मी त्यांच्याकडे पाहून अस्वस्थ होत होते. कितीदा तरी म्हणाले, अमोल, जाऊ दवाखान्यात,
पण त्यांनी हसून टाळलं, तेव्हा समजत नव्हतं. आज वाटतं त्या हसण्यातही एक प्रकारची वेदना दडली होती.
लग्न धुमधडाक्यात पार पडलं
नवरीच्या पावलांनी उंबरा ओलांडला. पाहुणे जिकडेतिकडे गेले. अमोलने एक गोळी घेतली…! म्हणाले, “थोडा आराम करतो…!
त्या काळोख रात्री,तो काळ आपली कधी परीक्षा घेतो, कळतच नाही…!
अचानक छातीत दुखू लागलं, उलट्या सुरू झाल्या, त्यांचं शरीर तापाने फणफणू लागलं आणि
माझं काळीज त्या क्षणाला तुटलं.
मी ओरडत होते, “काही होत नाही तुम्हाला. तुम्ही, मला असं सोडून जाऊ शकत नाहीत..!
तत्काळ गेवराईच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये भरती केलं.
डॉक्टरांनी तपासून पाहिलं.
त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. त्यांच्या एकाच वाक्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली,
जणू काळजावर कुणीतरी हात ठेवून घट्ट दाबलं होतं…! मी फक्त डोळे मिटले… आणि अंतःकरणातून स्वामी समर्थांचा जप सुरू केला…
“स्वामी समर्थ… स्वामी समर्थ..!
त्या क्षणी, प्रत्येक सेकंद जगणं कठीण होतं… आणि तिथेच मला
एका खऱ्या माणसाच्या रूपात देव भेटला. तो आमचा देव म्हणजेच…गेवराई चे माजी नगराध्यक्ष, समाजसेवेक
महेश अण्णा दाभाडे..!
दि.31/05/ 2025 ची रात्र जणू माझ्यासाठी काळरात्रच होती. माझ्या पतीला [ अमोल ] खूप ताप आलेला होता, थंडी वाजत होती. छातीतही खूप दुखत होते. त्या रात्री काय करावं ते मला काही समजत नव्हतं मी ठरवलं की महेश अण्णांना फोन करू, नेमका त्याच वेळेस त्यांचा फोन बंद होता. मग मी त्यांच्या पत्नी सौ. शितल ताईंना कॉल केला. कॉल घेईपर्यंत माझ्या हृदयाची धडधड जास्तच वाढली होती. त्यांनी कॉल उचलला आणि नेहमी सारखं मायेने विचारले “बोल ना सीमा, काय म्हणतेस ?”शितल ताईंचे हे बोलणे ऐकून माझा कंठ दाटून आला होता. पण तसेच रडक्या आवाजात बोलले “शितलताई, त्यांना थंडी आणि ताप खूप आलेला आहे. काय करावं ते कळत नाही” त्यावेळेस शितलताई म्हटल्या की घाबरू नकोस. होईल सगळं व्यवस्थित आणि त्यांनी महेश अण्णा कडे फोन दिला जसं कोणी आपल्या स्वतःच्या बाळाचे विचारपूस करत असतो त्याचप्रमाणे महेश अण्णांनी त्यावेळेस मला विचारलं की “काय झालं त्याला, तू घाबरू नकोस आहोत ना आम्ही तुझ्या पाठीशी. मी लगेच आपल्या काही पोरांना हॉस्पिटलमध्ये पाठवतो. अमोलला गेवराई क्रिटिकल केअर मध्ये घेऊन जा. अण्णांच्या एवढ्या वाक्यांनी माझ्या जीवात जीव आला. त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या सासूबाई आणि अमोल चे मावस भाऊ संतोष आस्कंद, अमोलचे भाऊ रंजीत आणि किसन हे दोघे सोबत होते.
पाच मिनिटांच्या आत अण्णांनी काही जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवले. ते आले आणि लगेच मला म्हटले की ताई चला यांना आपण डॉ. फाटक सरांकडे घेऊन जाऊ आम्ही लगेच तिथून गेलोत. ज्यावेळी आम्ही अमोलला गेवराई क्रिटिकल केअर मध्ये घेऊन गेलो तेव्हा मी कल्पनाही केली नव्हती की मला आता खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यांचं अंग विस्तवासारखं तापलेलं होतं, थंडीही वाजत होती त्यांना आठ ते दहा माणसांनी पकडले तरीही तापेच्या ओघात ते सर्वांना ढकलत मला जाऊ द्या, मला जायचे आहे असे ते जोरजोरात किंचाळत होते. माझे तर हातपाय गळून गेले डॉक्टरांनी लगेच त्यांना आयसीयू मध्ये घेऊन जाण्यास सांगितले आणि तिथे आयसीयू बेडवर त्यांना बेल्टने एखाद्या कैद्याला बांधतात तसे बांधले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली आणि मी फक्त त्यांच्याकडे एकटक बघत स्तब्ध उभे होते.
महेश अण्णा पुण्यावरून गेवराईला येण्यासाठी निघाले होते. अण्णांचे लहान बंधू सचिन शेठ दाभाडे यांना रूग्णालयात पाठवले होते. ते दिवसभर हॉस्पिटलमध्येच थांबून होते.
डॉक्टरांनी सांगितले होते की, अमोल चार ते पाच तासात शुद्धीवर येईल. घाबरू नका. जर, तुम्हाला संभाजीनगरला घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता परंतु त्यावेळेस मी म्हटले की अमोल स्टेबल होईपर्यंत येथेच राहू द्या तुमच्या निगराणी खाली तर सचिन भैय्या ही तेथेच होते. त्यांनीही हाच निर्णय योग्य आहे असे सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. मी फक्त नी फक्त उभी राहून त्यांच्याकडे एकटक पाहत होते. ते कधी डोळे उघडून मला बघतात. मनात श्री स्वामी समर्थांचा धावा करून, स्वामी सगळं काही व्यवस्थित होऊ दे….! माझा, माझी मुलगी अमोदिनी आणि मुलगा स्पंदन यांचा आधार आमच्या जवळून स्वामी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.
महेश अण्णांचे कॉल सारखे सुरू होते. जणू “घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी “अशी अवस्था महेश अण्णांच्या कॉलवरून त्यावेळेस वाटत होती. आठ तासांनी त्यांनी डोळ्यांच्या पापण्या अलगद हलवल्या आणि डोळे उघडले परंतु अजूनही त्यांच्या ओठातून शब्दही फुटत नव्हते पण माझ्या जीवात जीव
आला होता आणि त्याच वेळेस असं वाटलं की देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी माणसांच्या रूपात देव नेहमी आपल्या सोबत असतो.
अमोलने थोडे डोळे उघडले की मला माझ्या माहेराहून कॉल आला की ज्यावेळेस अमोल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्याच वेळेस तिकडे माझ्या भावाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्यालाही सुलतानपूरला ऍडमिट केले होते. देव जणू माझी आता परीक्षा घेत होता असं वाटत होत. इकडे अमोल आणि तिकडे दादा पण त्यावेळेस माझे गुरु भाऊ भक्तराज मस्के यांनी माझ्या भावाची जागा घेत मला आधार दिला जणू स्वामींनीच त्यांना पाठवले होते.
देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने अमोल आता थोडे बोलायला लागले आणि मला बरं वाटतंय असं म्हटले पण काय झालं त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याच वेळेस महेश अण्णा पुण्यावरून हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि आल्या आल्या जशी आई आपल्या बाळाची विचारपूस करते तसेच वागले स्वतःच्या खिशातून एक छोटीशी पुडी काढली आणि त्यातील अंगारा काढुन अमोलच्या कपाळाला लावला आणि म्हटले की चिंतेश्वराला म्हटलं की माझ्या लेकराला लवकरात लवकर बर कर रे बाबा….!
त्यांच्या या वागण्यातून स्पष्ट दिसत होते की सर्वसामान्यांना ते स्वतःच्या घरातील माणसासारखे वागवत असतात.
खरच महेश अण्णा म्हणजे सर्वसामान्यांचे विठ्ठलच आहेत जणू .विधानसभा निवडणुकीच्या वेळी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर महेश अण्णांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मराठा आरक्षणासंदर्भात स्वतःला झोकून दिल. समाजातील गोरगरिबासाठी ते सतत झगडत असतात समाजातील एखादा व्यक्ती संकटात असेल तर तो कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे याचा ते कधीच विचार करत नाहीत. अर्धी रात्र झालेली असो किंवा जेवतावरून ताटावरूनही उठायला ते मागे – पुढे बघत नाहीत. ते जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झगडताना दिसत असतात. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळातही त्यांनी कोणतेही काम असू ते प्रामाणिकपणे पार पडलेली होती. एखाद्या कामात न त्यांचा स्वार्थ ना कुठला फायदा जे काम असेल ते सर्व काही सर्वसामान्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी. खरोखरच जनतेच्या मनात ते अगोदरही सिंघम होते ,आताही आहेत आणि याच्यानंतरही ते जनतेचे सिंघमच राहतील .
विशेष म्हणजे त्या दिवशी माझे पती अमोल यांचा वाढदिवस होता. कदाचित सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उपयोगाला आल्या होत्या..! माझ्या कठीण काळात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. महेश अण्णांचा उल्लेख केल्याशिवाय, माझे मनोगत पूर्ण होऊ शकत नाही. ते आमच्या साठी देवच आहेत. हे ॠणानुबंध आणखी वाढत जातील. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रांनी अडचणीच्या काळात धीर दिलाय. मानसिक आधार दिला आहे.
त्यांच्या आभारासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांच्या ॠणात राहणार आहे.
लेखिका
सीमा अमोल होंडे (फरांडे )
गेवराई जि.बीड






