पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. नगर परिषदेचे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेची कामे करत आहेत.
त्या शिवाय, सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सामाजिक संघटनांचा ही, दरवर्षी स्वच्छता अभियानात सहभाग असतो. समाजाचा सहभाग पंढरपूर नगर परिषद प्रशासनाला उर्जा देत आलाय. युवा चेतना फाउंडेशन गेल्या तेरा वर्षांपासून चंद्रभागा वाळवंट, पासष्ट एक्कर परिसरात स्वच्छतेचा जागर करीत आले आहे. अशा उपक्रमशील कार्यास प्रशासनाचा नेहमीच पाठिंबा राहील, असे प्रतिपादन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी येथे बोलताना केले.
मंगळवार ता. 8 रोजी, सकाळी आठ वाजता युवा चेतना फाऊंडेशन च्या वतीने अमर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा वाळवंट परिसरात तीनशे,साडेतीनशे स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले. गेल्या 13 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो स्वयंसेवक दरवर्षी पंढरपुरात दाखल होतात. चंद्रभागा वाळवंट, पासष्ट एकर, दर्शन रांग परिसरात स्वच्छता केली जाते. नगर परिषदेचे प्रशासन युवा चेतना फाऊंडेशनच्या उपक्रमाला मदत करून, प्रोत्साहन देत आले आहे. 8 जुलै रोजी सकाळी आठ वाजता स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दुपारी बारा वाजता भेट देऊन, चेतना फाऊंडेशन च्या स्वयंसेवकांचे कौतुक केले. यावेळी, रोकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनखाली पंढरपूर नगर परिषद वारीच्या उत्सवात काम करते. नगर परिषदेचे दीड हजार कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात मुक्काम करून, आम्हाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्या काळात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे. अत्यावश्यक काय आहे. त्यावर भर कसा द्यायचा. या संदर्भात, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मार्गदर्शन केले. आम्ही प्रामुख्याने शौचालय, पाणी, विद्युत आणि घनकचरा व्यवस्थापन, अशा चार टप्प्यात कामाची व्यवस्थित आखणी केली. त्या आरखड्या नुसार नगर परिषद प्रशासनाने काम केले आहे. एकादशीच्या दिवशी 30 लाख शुद्ध पाण्याची बाॅटल मोफत देण्याचे नियोजन यशस्वी केले. हे सांघिक यश असून, वारीच्या उत्सवात दररोज शंभर टन कचरा गोळा करून, ठरवून दिलेल्या जागी गोळा केला जातो. त्यासाठी नपचे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. परंतु , सामाजिक जाणीव ठेवून, महाराष्ट्राच्या अनेक गावामधून विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना पंढरपुरात येऊन, स्वच्छता मोहिमेत राबवतात. खर म्हणजे, स्वच्छतेसाठी स्वतःहून मोहीम सुरू करणे, ही बाब कौतुकास्पद आहे. संत महंतांनी स्वच्छतेसाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असा उपदेश केलेला आहे. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश वास्तव स्वरूपात आणून, युवा चेतना फाऊंडेशन सारख्या अनेक सामाजिक संस्था पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवत आहेत. पंढरपुर नगर परिषदेच्या कार्यात त्यांचा ही वाटा आहे. असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शेवटी बोलताना केला. यावेळी, युवा चेतना फाऊंडेशन चे संचालक अमर कळमकर, प्रा. माई कळमकर यांच्यासह स्वयंसेवकांची उपस्थिती होती.






