मुंबईच्या वरळी डोम सभागृहात मराठीचा मोठा विजयी मेळावा पार पडला. त्रिभाषा सूत्राला विरोध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी सरकारला दोन पाऊल मागे घ्यायला भाग पाडले.
"म" मराठीचा आवाज बुलंद झाला. त्याही पेक्षा तब्बल एकोणीस-वीस वर्षांनंतर, दुरावलेले, दुखावलेले दोन बंधुंची गळाभेट झाली. मराठी माणसाला त्याचा आनंद आहे. "म" मराठीचा मुद्दा पुढे करून का होईना, हे दोघे भाऊ एकत्र आले. त्यासाठी वीस वर्ष लागली. हा भाग सोडून देऊ.
दै. सकाळ च्या अग्रलेख वरळीच्या सभेचा आशय धरून मुद्देसूद मांडला आहे. म्हणजे एखाद्या विषयाचा आशय घेऊन, त्यावर मते मांडता येतात. त्यालाच आपण कंन्टेन ॲनालिसीस म्हणतो. वरळी डोमच्या विजयी मेळाव्यात मराठीचा आशय ऐरणीवरचा मुद्दा होता. त्या मुद्द्यावर दोघे भाऊ एकत्र आले. दै. सकाळ ने त्यावर अग्रलेखातून भाष्य केले. त्यात पडद्याआडच्या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे. हा मुद्दा मांडताना त्यांनी राज यांची बाजू घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे केल्याचे दिसते.
एक गोष्ट मात्र झाली. बरोबर टायमिंग साधल्याने, मेळावा यशस्वी झाला. महाराष्ट्रातील माध्यमांनी त्या ऐतिहासिक घटनेची नोंद घेतली. मोठ मोठे मथळे छापून आले. प्रिंट – इलेक्ट्रॉनिक मिडियाने आपापल्या ॲन्गलने त्या घटनेचे विश्लेषण केले आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सरांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे जाहिर कौतुक केले. त्यांना उद्धव ठाकरे यांची भूमिका डावी वाटली. दैनिक सकाळ सारख्या दैनिकाने अग्रलेख लिहून भूमिका मांडली. त्यावर, दोन मतप्रवाह असू शकतात. 7 जूलै 2025 रोजी दै. सकाळ च्या पेपरात अग्रलेख छापून आला. गमंत म्हणजे सकाळचा मथळा हिंदीत आहे. मथळा आहे, बीस साल बाद..! मिथून दा आणि आपली मराठी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा जबरदस्त गाजलेला, हा चित्रपट आहे. मथळा हिंदीत आहे आणि संपूर्ण विश्लेषण मराठीत आहे. त्यांना ही, हिंदी भाषा आवश्यक वाटते. बर,
त्रिभाषा सूत्र ,
हे आताच आले नाही. मातृभाषा मराठी, राष्ट्र भाषा हिंदी आणि इंग्लिश. त्या – त्या मातृभाषा आणि पुढचे तेच दोन विषय, हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राहीले आहे. त्यामध्ये, फक्त एक बदल करण्यात आला. पहिली पासून हिंदी. आधी पाचवीच्या वर्गाला हिंदी विषय होताच. महात्मा गांधी यांनी सुचवलेले मूलद्योगी शिक्षण, त्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य होते. मात्र इतर भाषेचा ही आग्रह महात्मा गांधीनी धरला होता. त्यानंतर, 1948 साली मुदलीयार आयोग आला. पून्हा 1952 साली कोठारी आयोग आला. त्यानंतर पून्हा 1964 – 65 साली राधाकृष्ण आयोग आला. शेवटचे 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. या आयोगाने त्रिभाषा सूत्र कायम ठेवले. [ इसवीसन इकडे-तिकडे होईल, थोडफार ] कुठेखरी मेख आहे. वाचकांना, या गोष्टी सांगणे आवश्यक वाटते. म्हणून, त्या कालखंडातल्या नोंदी मांडल्या आहेत.
दै. सकाळने अग्रलेख छानच लिहिला आहे. समर्पक शब्दात दोन्ही भावांची भूमिका, त्यांचे एकत्र येणे; या संदर्भात अगदी मोकळेपणाने विवेचन केले आहे. राज ठाकरे यांनी मराठी मुद्दाला धरून विषय ऐरणीवर आणला. स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली. राज साहेबांची भूमिका मराठीचा आग्रह धरणारी होती. मात्र , तेवढीच ती सावधपणे, अराजकीय स्वरूपाची होती. असे निरिक्षण अग्रलेखात नांदविले आहे. याचा अर्थ, उद्धव ठाकरे यांच्यावर ते लगेच विश्वास टाकायला तयार नाहीत. शिवसेनेशी ते जुळवून घेतील. पण मग, त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्थान काय ? मुंबई महापालिका आणि इतर निवडणुका युती करून लढायच्या का, हा विषय सुद्धा त्यांच्या डोक्यात असू शकतो. शेवटी त्यांना स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचे आहेच.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणात राजकीय भूमिकाच अधिक दिसली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. अनाजीपंत असा उल्लेख करून, त्यांनी फडणवीसांना डिवचलेच. एकनाथराव शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला.
उद्धव ठाकरे यांनी भाषणात शंभर टक्के राजकीय सूर आळवला. सध्याची राजकीय स्थिती पाहता. उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंची गरज अधिक वाटते. असे अग्रलेखात नमुद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल, असे चित्र दिसते आहे. आधीच, दोन – तीन वेळा पक्ष फुटला आहे. आज रोजी केवळ 15 – 20 आमदार आहेत. दहा-बारा खासदार आहेत. सत्ता नाही. भाजपा सारखा बलाढ्य पक्ष महानगरपालिका घ्यायच्या तयारीत आहे.
अचाट बुद्धीचे, चाणाक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचे नेतृत्व आहे. त्यामुळे, शिवसेनेला भिती वाटणे स्वाभाविक आहे.
महापालिकेत दोघे ठाकरे बंधू एकत्र लढल्यास फायदाच होईल. मराठी माणसाला आणि विशेषत: अमराठीला माणसाला ठाकरे घराण्याचे आकर्षण आहेच. तसे, झाल्यास भाजपाचे आणि शिंदे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण होणार नाही. याकडे, अग्रलेखात लक्ष वेधले आहे.
अग्रलेख वृत्तपत्राचा आत्मा असतो. एक व्यापक, स्वतंत्र भूमिका मांडता येते. भले, अग्रलेख वाचणारांची संख्या कमी का असेना, मात्र अग्रलेखातील मते ठामपणाने, विचारपूर्वक मांडलेली असतात. म्हणून, दै. सकाळ च्या अग्रलेखाकडे दूर्लक्ष करता येणार नाही. अहंकार सोडून, तू मोठा की, मी मोठा. फक्त मराठीचा “म” मोठा, या एकाच मुद्द्यावर दोघां भावांना चांगली संधी आहे. त्या संधीचा पुरेपूर वापर करून पुढे जाता येईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केली. ही संधी घातली, मग मात्र अवघड होईल. आयुष्यातील मोठी संधी निघून जाईल. असे, भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. सकाळच्या अग्रलेखाचा शेवट चिंतन करणारा आहे. ठाकरे बंधुंचे एकत्र दिसणे, देखणे असले तरी पुरेसे नाही. याचाच अर्थ, पुढची वाट सोपी नाही. भाजपाचा गतिरोध कसा दूर करणार, हा प्रश्न आहे. हाच, दै. सकाळच्या अग्रलेखाचा विश्लेषणात्मक आशय, निष्कर्ष आहे.
सुभाष सुतार , पत्रकार,
गेवराई – बीड






