महाराष्ट्र हिताचे निर्णय घेणाऱ्या विधिमंडळाच्या सभागृहात कृषी खात्याचा मंत्री चक्क पत्ताचा डाव खेळतो. शेतकरी आत्महत्या करतोय. पाऊस,पाणी नाही. त्या विवंचनेत शेतकरी आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकरी बापासाठी एखादी योजना जाहीर होते का ? कृषी मंत्री काय बोलतात, याकडे तो लक्ष वेधून होतो. तर,आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चक्क रम्मी खेळात दंग दिसले. माणिकाला कलंक लागला. त्या व्हिडीओच्या कृतीने माणिकाच्या बुद्धीची कीव आली. असा, नालायक मंत्री एवढ्या वर्षात पाहिला नाही. तीन महिन्यांत जवळपास सातशे शेतकर्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. राज्याचा कृषी मंत्री म्हणून, त्यावर चिंता व्यक्त करायची सोडून,
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे “रम्मी” खेळात गुंग आहेत. चष्म्यातून राणी पाहण्यात दंग आहेत.त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. तो व्हिडीओ विधिमंडळ सभागृहातला आहे. तो कोणी शूट केला. सत्ताधारी आमदाराने, मंत्र्याने की, विरोधी आमदाराने केला. या विषयी संशयाचे धुके निर्माण झाले आहे.कोकाटे यांनी त्या वादग्रस्त व्हिडीओ च्या संदर्भाने खुलासा करून, स्वतःची बाजू मांडली आहे. मात्र, ते चक्क खोटे बोलत आहेत. ते ऑनलाईन रम्मी खेळत होते. त्यांच्या मोबाईलवर क्लिअर रम्मीचा डाव दिसतो आहे. ते म्हणतात,यू ट्यूब पाहत असताना रम्मीची
जाहिरात आली. खरय, यूट्यूब चॅनल पाहताना, अचानक कोणतीही जाहिरात येते. परंतु , कोकाटें च्या मोबाईलवर आलेली ती जाहिरात नव्हती. कोकाटे यांच्या मोबाईलवर जाहिरात कशी येईल ? ते यूट्यूब पाहत नव्हते. ते रम्मी सर्कलचे ॲप उघडून बसले होते.
त्यांनी आधीच रम्मी खेळाचे ॲप डाऊनलोड करून ठेवलेले आहे. याचा अर्थ, ते रम्मी खेळत होते. रम्मीच्या डावात रंगलेला मंत्री चष्म्यातून राणी पाहतोय. हे महाराष्ट्राने पाहिले. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे. गेल्या महिनाभरात पावसाने पाठ फिरवली. पिके चार पानावर थांबली आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. खतांचे भाव गगनाला भिडलेत. कृषी दुकानाचे दुकानदार भाडखाऊ धंदे करून, शेतकरी बापाची लूटमार करीत आहेत. या कडे, कोकाटेंना पाहायला वेळ नाही. कारण, ते चष्म्यातून “राणी” पाहत आहेत. कृषी विभागाला नवे रूप देण्याची गरज आहे. नव्या योजना, शेतीचे नवे धोरण, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, कोकाटे महाराजांना त्यासाठी वेळ नाही.
वैधानिक पदावर बसलेला माणूस विधिमंडळात रम्मी खेळतो. पदाची आब घालवितो. मुख्यमंत्री देवाभाऊ गप्प बसू नका. आधी कोकाटेंना हाकलून द्या. या आधी ही, कोकाटे यांनी शेतकर्यांना कमी लेखले आहे. त्यांच्या लेखी शेती-माती आणि शेतकरी कस्पटासमान आहे.खर तर, कोकाटे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा देऊन, महाराष्ट्रातील शेतकर्यांची माफी मागायला हवी होती. होय, माझे चुकलेच. मी, रम्मी खेळत होतो. हे सांगायला आता लाज वाटते का ? हे म्हणजे, तो मी नव्हेच. हे वर्तन चांगले नाही. अशा वातावरणाने, राजकारणातल्या नैतिक मूल्यांना घरघर लागली आहे. मंत्री, आमदार पदावर असताना काहीही वक्तव्य करतो. हाणामारी, गुंडगिरी करतो. त्यांचे पक्ष प्रमुख काहीच भूमिका स्पष्ट करीत नाहीत. उलट, माजलेल्या मंत्री, आमदारांना अभय देतात. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांना बोलावे लागते. त्यांना लोकभावना समजली. हे बरे झाले. मुख्यमंत्री स्वतःच म्हणालेत, आमदार, मंत्री माजलेत. विधिमंडळाचे अधिवेशन संपले आणि दुसर्याच दिवशी माजलेल्या एका मंत्र्याचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करणारे कोकाटे यांच्या कृतीने इज्जतीचा पंचनामा झाला आहे. माणिकराव कोकाटे यांनी पान, फुलात, झाडात, डौलदार पिकांच्या शेतात रमायचे सोडून, बारा पानांच्या रम्मीत रमले. चष्म्यातून चक्क राणी पाहत आहेत. विधिमंडळातले त्यांचे वर्तन म्हणजे, अक्कल गहाण ठेवून केलेली अक्षम्य कृती आहे. गोरगरीब, काबाडकष्ट करणाऱ्या शेतकर्यांना, असा मंत्री नकोय. माणिकराव, जनाची नाही तर, मनाची लाज राखा.
तातडीने राजीनामा द्या..!
सुभाष सुतार, पत्रकार गेवराई-बीड






