श्री…दत्त म्हणून हजर राहायचे आणि जमेल तशी बांधिलकी ठेवून काम करायचे. अशी, असंख्य माणसे आपण पहात असतो. ती आपल्या अगदी अवतीभवती असतात. कामाशी काम करत रहातात. त्यांच्या कामाचे कौतुक वाटत राहते.
असेच एक हसतमुख व्यक्तिमत्त्वाचे पत्रकार मित्र आहेत. “ते” दिवसभर पायी चालत, चालत बातमी कव्हर करतात. त्यांना दुचाकी चालवता येत नाही. म्हणून, त्यांच काही अडत ही नाही. त्यांनी, आपल्या अंगभूत गुणांनी
पत्रकारितेत वलय निर्माण केलय. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे विशेष योगदान राहीले आहे. वृक्ष लावायचा, तो वाढवायचा; तरच वृक्ष चळवळ उभी राहू शकेल, अशी स्वतःची धारणा ठेवून काम करणारा त्यांचा स्वभाव चटकन लक्षात राहतो.
पंधरा वर्षांपासून ते दैनिक लोकमत वृत्तपत्राचे तालुका वार्ताहर म्हणून काम करत आहेत. एवढ्या मोठ्या वृत्तपत्रात काम करतात. त्यांना कसलाही अहंमपणा नाही. बातमीकडे, बातमी म्हणून पहायचे. लोकमतला पाठवून द्यायची. एवढा साधेपणा टिकवून ठेवून ते कार्यरत आहेत. ते आहेत लोकमित्र, सखाराम आसाराम शिंदे..! पत्रकार, दैनिक लोकमत, गेवराई जि.बीड.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक शुभेच्छापत्र, खास त्यांच्यासाठीच, म्हटल तर शब्दपुष्प..!
पंधरा वर्ष झाली ते वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. जेष्ठ पत्रकार संतोष भोसले यांच्या आग्रहाखातर ते पत्रकार झाले. दै. रणझुंझार मध्ये सहा वर्ष काम केले. याच अनुभवाच्या जोरावर त्यांना पंधरा वर्षांपूर्वी दै. लोकमत मध्ये काम करायची संधी उपलब्ध झाली. त्या संधीचे सोने करून, त्यांनी सर्वसामान्य वाचक, आणि समाजातल्या सर्व सामान्य घटकांपर्यंत नाव लौकिक केला आहे. सखारामजी यांच्या बातमीचे विषय अगदी सर्वसामान्य माणसाच्या चेहर्यावर हास्य फुलविणारे असतात. लहान सहान प्रश्न ऐरणीवर आणून त्यांनी बातमी आणि वाचकांवर स्वतःचा ठसा उमटवला आहे. समस्या आणि अडचणी, असे दोन्ही विषय त्यांनी सहजपणे बातमीतून मांडलेत. स्पॉटवर जावून बातमीला आकार देण्याकडे त्यांचा कल राहीलाय.
पाट्या टाकण्यापेक्षा, बातमीत जीव ओतून काम करणारे शिंदे लोकमित्र म्हणून नावारूपास आलेत. ते त्यांच्या प्रमाणीक कामाने, ही बाब सुखावणारी आहे. मनाला समाधान लाभणारी पत्रकारिता त्यांनी केलीय. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचा गौरव झाला. कौतुकाने नंम्र होणारा त्यांच्या स्वभावाने, त्यांनी असंख्य मित्रांचा गोतावळा मिळवला आहे.
जनतेचे प्रबोधन व्हावे, या अर्थाने, कृषी विकासाच्या बातम्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांनी वाचकां पुढे ठेवून प्रेरणा दिली आहे. कृषी सह अन्य विषयातल्या यशोगाथा जनतेपर्यंत जातील, या दृष्टिकोनातून त्यांचे काम वाखण्याजोगे राहीले आहे. सरकारी दवाखाना, तहसील, पोलीस विभागात त्यांनी चांगले काॅन्टॅक्ट निर्माण केलेत. त्याचा उपयोग सर्व सामान्य माणसाला होईल, या साठी त्यांचे प्रयत्न असतात. गमंत म्हणजे, त्यांना गाडी चालवता येत नाही. बातमीचे स्थळ लांब असेल तर मित्राच्या गाडीवर बसून जाणयात धन्यता मानून, गाडी शिकायच्या भानगडीत ते अजूनपर्यंत पडले नाहीत, हे एक कोडेच आहे. त्या विषयावर विचारले तर ते केवळ हसून दाद देतात. मनात कसलाही राग, लोभ, द्वेष न ठेवता त्यांचा कुठेही राबता असतो. वाचक हिताच्या बातमीला प्राधान्य देतात. बातमीत “बात” अधिक आणि “मी” कमी, हे सोपे सूत्र त्यांनी आत्मसात केलय.
ज्येष्ठ पत्रकार स्व. संतोष भोसले यांचे मेहुणे आणि सखाराम शिंदे यांचे
वडील आम्हाला पत्रकारितेत मदत करायचे. एखादी “हिंट”द्यायचे. खर तर, ते आमचा “सोर्स” होते. मात्र, त्यांनी कधीच नकारात्मक गोष्टी सांगितल्या नाहीत. चांगला दृष्टिकोन ठेवून माहीती द्यायचे. भांडू – तंडू नकारे..! तुम्ही अजून लहान आहात. चांगल्या बातम्या येऊद्या. काय सुतार, कुठय संतोष..! हे त्यांचे ठरलेले वाक्य. भारी स्वभाव असलेले आसाराम मामा अकाली गेले. सखारामजी हे, स्व. संतोष भोसले यांचे भाच्चे आहेत. भोसले यांच्या सोबत सखारामजींच्या घरी कितीदा तरी जाणे झाले आहे. त्यांच्या मातु:श्री मला नावाने ओळखतात. त्यांच्या संबंधी एक आठवण आहे.
असेच एकदा, भोसले यांनी दूरध्वनीवरून माहीती कळवली की, सुतारजी माझ्या बहीणाला (शकुंतला ताई शिंदे) कॅन्सरचे निदान झालय. आपल्याला जालना जिल्ह्य़ात जाऊन खा. दानवे साहेबांचे पत्र आणायला जायचे आहे. आम्ही सकाळीच निघालो.. टू व्हिलरवर…! जालना जवळ केले. पत्र घेतले.
पण साहेब तिथे नव्हते. ते कारखान्यावर होते. कारखाना बराच लांब होता. वेळ ही बराच झाला होता. पत्रावर सही आवश्यक होती. सही घ्यायला रात्र झाली. मग, जालन्यात मुक्काम केला. पहाटे चार वाजता जालन्याहून निघालोत आणि सकाळीच गेवराई शहरात आलोत. पत्र मिळाल्याचा फायदा झाला. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्या आज ठणठणीत आहेत. त्याची भेट झाली की, खूप आनंद वाटतो. त्यांचे चिरंजीव, सखाराम शिंदे आज आमच्या सोबत पत्रकारितेत आहेत. कधीतरी ज्यांच्या घरी जायचो. त्यांची फारशी ओळख नव्हती. तेच सखारामजी बातमीच्या माध्यमातून सहकारी मित्र झाले आहेत.
अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग सांगतात, फार बोलते राहीलेच पाहिजे असे काही नाही. कमी बोलून ही जास्तीचे कामे करता येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणून, पत्रकार सखाराम शिंदे यांच्या पत्रकारितेकडे पाहता येईल. फार डाव -उजव न करता बातमीतून निर्भीड पत्रकारिता ,त्यांचे वैशिष्ट्य राहीले आहे. यलो जर्नालिझम च्या चौकटीत त्यांना कधी रस वाटला नाही. बातम्या वाचकांसाठी द्यायच्या, एवढा ठळक उद्देश त्यांनी ठेवलाय. न्यूज व्हॅल्यू त्यांना चांगळा कळतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून त्यांनी बातमीदारी केली आहे.
समर्थ म्हणायचे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..! पाॅझिटिव्ह राहून कामात राम शोधणारे सखारामजी, समाजाच्या हिताची पत्रकारिता करताहेत, हीच गोष्ट त्यांचे मोठेपण अधोरेखित करते. लोकमत सारखे वृत्तपत्र हाती असताना, सर्वसामान्य जनतेची गाऱ्हाणी बातमीच्या माध्यमातून मांडणारे सखारामजी, खरे लोकमित्र आहेत. यापुढे ही, बांधिलकी जोपासून काम करत रहा.
उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका, एवढीच माफक अपेक्षा आहे.
सुभाष सुतार , पत्रकार
गेवराई -बीड
(पत्रकार)






