गेवराई – बीड :- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान व तुळजाभवानी देवीचे मंदिर असून, या तीर्थकुंड म्हणून प्रसिद्ध असलेले पुरातण कल्लोळ तीर्थ आहे. या कल्लोळ तीर्थातील पाणी भाविक – भक्त तिर्थ म्हणून तोंडात घेतात व डोळयाला देखील लावतात. श्रध्दा व अस्मितेचे धार्मिक ठिकाण असलेल्या या कल्लोळ तीर्थाची विटंबना होऊ नये यासाठी तीर्थ कुंडात गणपती बाप्पाचे विसर्जन करू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारद्वारे केले आहे.
श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतचे प्रशासक मुसळे साहेब व पोलिस प्रशासन यांनी गांभीर्याने विचार करून योग्य त्या पध्दतीने व्यवस्था करावी, अशी मागणी देखील बापू गाडेकर यांनी केली आहे. या कल्लोळ तीर्थाचे मालकी हक्कात हिस्सेदारी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जयदेव शिंगणे यांनी देखील तलवाडा पोलिसांना कल्लोळ तिर्थात गणपती विसर्जन न करणेबाबत शुक्रवारी लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. त्यामुळे कोणीही कल्लोळ तिर्थात गणपती विसर्जन करणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन त्याठिकाणी आज शनिवारी दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी देखील बापू गाडेकर व जयदेव शिंगणे यांनी केली आहे.






