ते उच्च विद्या विभूषित शिक्षक आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या उच्च प्राथमिक – माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवतात. गोरगरीब समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात तावून सुलाखून निघाली पाहिजेत. या विचार – वैभवाच्या दिशेने चालत आलेला त्यांचा अध्यापनाचा प्रवास नवल वाटणारा आहे. ते दिसतात तेव्हा, विद्या विनयन शोभते, हे सुभाषित आठवते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवता, शिकवता तेहतीस वर्षाचा कालखंड लोटला. मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेता, घेता फाडफाड इंग्लिश बोलावे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्यासाठी, निष्ठा ठेवून काम करणाऱ्या डॉक्टर तात्यासाहेब हरिभाऊ मेघारे यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानदीप पेटवता आला. खर म्हणजे, डॉ. तात्यासाहेब हे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे साने गरुजीच आहेत. त्यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. आजवरच्या शैक्षणिक कालखंडात त्यांना जवळपास पंधरा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुरस्काराने उर्जा मिळते. त्या बळावर शिक्षक-विद्यार्थ्यांची नाती आणखी दृढ होत जातात. सरांच्या कर्तृत्वाची दखल शारदा प्रतिष्ठानने घेतली. 5 सप्टेंबर 2025 रोजी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करता करता, ते ही शिकले. त्यांनी इंग्लिश विषयातून बीएड केलय. विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी विशेष गुणांनी मिळवल्यात. ते विद्यावाचस्पती झालेत. एखाद्या आदर्श शिक्षकाकडे कोणती गुणसंपदा हवी, असा प्रश्न पालकांना पडलाच तर, त्यांनी मेघारे सरांच्या व्यक्तिमत्त्वा कडे एक दृष्टिक्षेप टाकावा, त्यांना धन्यता लाभेल. त्यांच्या कार्याची समाजाने, शासनाने, सामाजिक संस्थांनी दखल घेतली. आपण ही त्यांची दखल घ्यावी, या हेतूनेच मेघारे सरांच्या तेहतीस वर्षाच्या शैक्षणिक कर्तृत्वाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉक्टर तात्यासाहेब मेघारे, मु.पो. धोंडराई ता. गेवराई जि.बीड येथील भूमिपुत्र आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावातल्याच शाळेत त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. मेघारे सरांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे होते. अकरा-बारावीच्या शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. ते हुशार विद्यार्थी होते. एम.बी. जाधव, शेख निजाम यांच्या सारखे चांगले शिक्षक लाभले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. देवगिरी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. चांगले मार्क आले. मात्र, आर्थिक परिस्थिती आडवी आल्याने; त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही.
तात्यासाहेब मेघारे यांनी सन 1991 त्यांनी डिएड केले आणि लागलीच त्यांना नौकरी ही लागली. 1992 साली संभाजीनगर [औरंगाबाद] येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाला सुरूवात झाली. तेहतीस वर्षाच्या कालखंडात संभाजीनगर, गंगापूर, पैठण, गेवराई जि.बीड येथील शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे. गोदामाईच्या अंगा खांद्यावर लहानचे मोठे झालेल्या तात्यासाहेबांना जन्मभूमीत सेवा करायची संधी मिळाली. जवळपास अठरा वर्ष त्यांनी धोंडराईत शिक्षक म्हणून काम केले.
धोंडराई ता.गेवराई जि.बीड सारख्या गाव खेड्यातल्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याकडे त्यांनी लक्ष दिले. धोंडराई गाव गेवराई-शेवगाव राज्य रस्त्यावर आहे. या गावाला गोदाकाठ लाभलेला आहे. गेवराई घळाटा अन धोंडराईला बारा वाटा, असे गंमतीने म्हटले जायचे. तो काळ आता मागे पडला. गाव शैक्षणिक प्रवाहात आलाय. धोंडराईच्या बारा वाटा उजळून निघाल्यात. या गावच्या वाटेवर पन्नास, साठ शिक्षक ताठ मानेने उभे राहीले आहेत. त्या मध्ये मेघारे यांचा वाटा आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने, दूरदर्शन सारख्या माध्यमांनी ज्या करपे सरांची दखल घेतली. ते धर्मराज करपे, जगन्नाथ जाधव,जालिंदर ठवरे, तात्यासाहेबांचे प्रिय विद्यार्थी राहीलेत.
शिक्षणाची सद्यस्थिती, शिक्षणातले नवे प्रवाह आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी ,या संदर्भात
तात्यासाहेब मेघारे यांच्याशी चर्चा केली. त्यांची भूमिका समजून घेतली. ते म्हणाले, शहरी भागात शिक्षणाची सोयी उपलब्ध झाल्या. त्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडथळे आले. हे वास्तव अधोरेखित करत असताना, अलीकडच्या काळात नवे तंत्रज्ञान आले. त्याचा फायदा झाला आहे. शिक्षणात इंग्लिश आणि गणित हे महत्त्वाचे दोन विषय, ज्या विषयावर विद्यार्थ्यांवर दडपण येते किंवा ते विषय त्यांना किचकट वाटतात. मात्र, हे दोन्ही विषय सोपे करून मांडता येतात. कोणत्याही विषयाचा पाया पक्का असायला हवा. त्या दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक वाटते. इंग्रजी विषयात शब्दांना महत्त्व आहे. शब्द साठा असेल आणि अधूनमधून सराव केला की, फाडफाड इंग्लिश बोलता येते. हा माझा अनुभव आहे. मी सुद्धा ग्रामीण भागातून आलोय. मला माझ्या शिक्षकांनीच घडवले. प्रश्न आहे तो, कष्ट करण्याचा. जिद्द, चिकाटीने इंग्लिश, गणिता शिवाय कोणत्याही विषयावर प्रावीण्य मिळवता येते. हे पहा, गणितात मुलभूत क्रिया आहेत. एक प्रकरचा ढाचा आहे. तो समजून घेतला, त्यामध्ये सातत्य ठेवून बेस पक्का करे पर्यंत पिच्छा सोडायचा नाही. या गोष्टीकडे हेतूपुरस्सर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नेपोलियन यांनीच सांगितलय, एव्हरीथिंग इज पाॅसिबल, सगळे काही शक्य आहे. विद्यार्थ्यांनी त्या विषयाकडे, त्या नजरेतून पाहावे; असा प्रयत्न शिक्षकांनी करावा, अशी किमान अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मेघारे सरांचे काही खास वैशिष्ट्य आहेत. ज्या मुळे, विद्यार्थ्यां मध्ये असलेला न्यूनगंड बाहेर पडतो. वर्गात गेल्यावर, त्यांचा पहिलाच सवाल असतो. हाऊ टू लर्न इंग्लिश ? यू कॅन डू इट, व्हाय नाॅट ? येस , यू कॅन स्पीक इंग्लिश..! विद्यार्थ्यांचा चेहराच खुलतो. त्यांना बळ मिळते. अरे, पोरांनो..! तुम्ही खेड्यातले आहात ना, मी सुद्धा खेड्यातलाच आहे. मी कसे शिकलो. अभ्यास करून, सराव करून, अवघड काहीच नाही.
त्यांनी, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पोकन इंग्लिश चे धडे दिलेत. दहा – बारा वर्षांपासून या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. शाळेत अध्यापन करणे, हा शासकीय नियम झाला. मात्र, शाळा सुटल्यावर, सुट्टीच्या काळात इंग्रजी, गणिताचे धडे देण्याची जबाबदारी त्यांनी प्रमाणीकपणे पार पाडली आहे.
ते बीड जिल्ह्याचे इंग्लिश विषयाचे ॲम्बॅसीडर आहेत. राज्य, राष्ट्रीय स्तरावर इंग्लिश, गणित विषयाचे शोध निबंध यशस्वीपणे सादर करून, बीड जिल्हाचे नेतृत्व केले आहे. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध यांनी शिक्षणाच्या संदर्भात छान विचार मांडलाय. ते सांगतात, जी मुक्त करते ती विद्या. या अर्थाने, तात्यासाहेब मेघारे यांनी तेहतीस वर्षाच्या अध्यापन सेवेत विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचे शैक्षणिक योगदान, शिक्षणातला एक मैलाचा दगड आहे.
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख झाली. त्या शिवाय, शिक्षकांचे ही आयकाॅन झाले. त्यामुळेच, डॉक्टर मेघारे यांना वर्षाला
शंभर कोटीची उलाढाल असलेल्या गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावर दोनदा काम करण्याची संधी मिळाली. खर म्हणजे, ते बहुआयामी आहेत. चेहर्यावर मंद हास्य असते. कंटाळा त्यांना माहित नाही. निष्ठेने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. या कामाचे त्यांना फळ ही मिळाले. त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाली आहेत. मुलगा विदेशात शिकून डॉक्टर [ एमबीबीएस] झाला. मुलगी एमडी [ डॉक्टर ऑफ मेडिसीन ]
आहे. हे सगळे संचित त्यांच्या पदरात पडले. सौ. शारदा ताई मोटे – मेघारे यांनी पत्नी म्हणून खंबीर साथ दिली. मेघारे सरांच्या यशस्वी वाटचालीत शारदेचे चांदणे आले. कुटुंबाच्या साथीने शब्दांचे धन मिळाले, बळ मिळाले. समाजऋणाच्या शाश्वत सत्याला जागणारा ध्येय वेडा शिक्षक म्हणून डॉक्टर तात्यासाहेब मेघारे यांनी गावपण जपले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात नैतिक मूल्यांचे आचरण व्हावे म्हणून गावात कर्मवीर सार्वजनिक वाचनालयाची सुरूवात केली. वृक्षारोपण ,अंध श्रद्धा निर्मुलन व्यसन मुक्ती ,रक्तदान शिबिर, स्पर्धा परिक्षेचे क्लास सुरू केले. आपली आई धोंडराई ,या हॉट्स अप ग्रुपवरचा त्यांचा सहभाग नेहमीच परिवर्तनवादी विचाराची पेरणी करतो आहे. मेघारे सर, तुम्ही समाज शिक्षक आहात. आणखी मोठे व्हा, गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांना तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,तुमचू मनापासून अभिनंदन, शुभेच्छा..!
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






