त्यांनी फक्त एकदा कुटुंबाशी बोलून मनातली भावना व्यक्त करायला हवी होती. मात्र, ते मित्राशी बोलले. मी, फार निराश झालोय.
मित्राने समजूत ही काढली असणार, विषय तो नाही. हेच, त्यांनी कुटुंबाला सांगून कळत नकळत झालेल्या गोष्टी शेअर केल्या असत्या तर….!
गरजे पुरता पैसा कष्टाने कोरून कधीही मिळवता येतो. पैशा पाण्याची गोष्ट फार अवघड नाही. अवघड झाली म्हणजे समजून जा की, इश्वर तुमची फक्त परीक्षा पाहतो, घेत नाही. मात्र, गेला जीव परत येत नाही.
परंतु, घटना घडून गेली आहे. त्या गोष्टिला तसा अर्थ नाही. मात्र, गोविंद यांच्या जाण्याने अनेक प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरे मिळतील की नाही, माहित नाही. बरगे कुटुंबाला मोठा आघात झाला आहे. हे मात्र निश्चित आहे.
गेवराई जि.बीड येथील पंचायत समितीच्या आवारात पायाला भिंगरी लावून फिरणारे , लुखा मसला ग्रामपंचायतीचे उप सरपंच गोविंद बरगे यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी बाहेर पडली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रशासकीय कामात ते कुणालाही मदत करायचे. अशी भावना व्यक्त झाली.
त्यांच्या मृत्युला बार्शी जि. सोलापूर येथील कला केंद्राची किनार लागल्याने, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आधी, अनेकांना विश्वासाच बसला नाही. एका नर्तकीच्या बदसलुकीने गोविंद बरगे जीवानिशी गेले. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झालेत. आठ जूलै रोजी ते बाशी तालुक्यात पुजा हिला भेटायला गेले होते. मंगळवार ता. 9 रोजी
सकाळी सासुरे ता. बार्शी जि. सोलापूर मृतदेह आढळून आला होता. पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुणीला अटक झाली आहे. तपास सुरू झालाय, तो कुठपर्यंत जातो,हे पाहावे लागेल.
गोविंद आणि पुजा यांच्यात प्रेम संबंध होते का ? होते तर, ते कोणत्या मर्यादेपर्यंत होते. त्यांच्या नात्यातला गोडवा का संपला ? पुजा हिने, केवळ पैशावर प्रेम केले ? तिच्या आईला, भावाला या सगळ्या गोष्टी माहित होत्या. त्यांनी, समेट घडवून आणायला हवा होता. झाल ते झाले. तुम्ही तुमच्या लेकरा – बाळात जा, या पुढे आमच्या घरी येऊ नका. एवढी माणुसकी दाखवला हवी होती. कुटुंबातला कर्ता माणुस गेल्यावर, कुटुंबाची आबाळ होते. काही गोष्टी, खूपच कठीण असतात. त्या सहज स्वीकारता येत नाहीत. तो एक मोठा सामाजिक अडसर आहे. कारण, सत्य कटू असते. आज गोविंद जग सोडून गेले. म्हणून, विषय ऐरणीवर आला. या निमित्ताने अशा अनेक घरतल्या गोविंदाचा प्रश्न उरतोच. एकदा,
एक सुंदर ललना स्वामी विवेकानंद यांच्या कडे आली. तिने स्वामीजीं समोर प्रस्ताव ठेवला. मला तुम्ही फार आवडता. माझा तुमच्यावर जीव जडला आहे. माझी सगळी संपत्ती, माझं सौंदर्य तुमच्या पायावर ठेवते. स्वामी विवेकानंद चित्त स्थिर ठेवून ऐकत होते. सौंदर्यवतीचे बोलणे ऐकून झाल्यावर,ते म्हणाले की, बाई मी तुला नमस्कार करतो. काहीच दिवसात विझणार्या सौंदर्याची दलदल माजवून जगू नका. क्षण सुखाच्या मोहा पायी, त्याच दलदलीत अडकून गतप्राण व्हाल. ऐन यौवनात सुद्धा ज्यांच्या ठायी विवेक आणि वैराग्याचा प्रभाव आढळतो ते धन्य आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, विवेक आणि वैराग्य, हेच जाणावे महत भाग्य..!
बरगे यांच्या मृत्युने कला केन्द्र वादात सापडली आहेत. खर तर, लोकनाटय कला केन्द्राकडे मनोरंजनाचे साधने म्हणून पाहिले जाते. आता, तो बाज राहीला नाही. हा भाग वेगळा. सर्व सामान्य माणूस तिकडे फिरकू शकत नाही. हे वास्तव अलीकडच्या काळातले आहे.
लोकनाट्य कलेच्या नावाखाली नेमके काय चालते ? हा शोधाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कला केन्द्र रात्रभर सुरू असतात. ढोलकीवरची थाप, घुंगरांचा खणखणाट आणि मंद प्रकाशातली उडत्या चालीची गाणी अनेकांना घायाळ करून सोडतात.
बरगे यांच्या मृत्युने अनेक प्रश्न उभे राहीलेत. गोविंद यांनी गेवराई कधी सोडली ? त्यांच्या सोबत कोणी होते का ? ते एकटेच गेले असे गृहीत धरले तर, पुजा च्या गावात गेल्यावर कोणी सोबत आले होते ? गोविंद यांना पुजाचे नातेवाईक ओळखत होते. तिच्या आईने, भावाने तिच्याशी बोलणे करून दिले होते. अशी माहिती आहे. याचाच अर्थ, ते तिच्या घरात काही काळ थांबले असतील. त्या रात्री नेमके काय झाले ? त्यांचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या चार चाकी गाडीत मृतावस्थेत आढळून आला. म्हणजे त्यांनी स्वतःच गोळी झाडून घेतली की, त्यांना तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले ? हा यक्ष प्रश्न आहे. पुजा म्हणते की, मी रात्रभर कला केंद्रावर होते. ते खरे की खोटे. दोघांचे ही काॅल डिटेल पोलीस तपासून पाहतीलच. त्या शिवाय, गाडीत किंवा गाडीच्या अवतीभवती कोणी होते का ? या संदर्भात, उलट सुलट चर्चा आहे. गाडीत संशयास्पद गोष्टी आढळून आल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
या घटनेची ,सोशल माध्यमांवर दोन अंगाने चर्चा होऊ लागली आहे. पिंजरा चित्रपटातले संदर्भ जोडले जात आहेत. तमाशा, कला केन्द्र लई वाईट गोष्टी, लेकरा – बाळाच्या गडी माणसाने त्या फंदात कशाला पडायचे ? सोन्या सारखा संसार वाऱ्यावर सोडून, कला केन्द्रात मनोरंजन करणाऱ्या बाईवर प्रेम करायचे असते का ? तिथे दररोज किती येतात, जातात. कलेची कदर करून, आपले गाव, कुटुंब जवळ करायचे सोडून, भलताच नाद चांगला नाही. लोकभावना दोन्ही अंगाने, विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भावनेतून मते मांडली जात आहेत. एकाच नाण्याला दोन बाजू, या अर्थाने लोक मते मांडतांना दिसताहेत.
स्व. गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांची आज आठवण येते. त्यांनीच डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. सर्व सामान्य माणूस, विशेषत महिलांनी त्या निर्णयाचे स्वागत केले होते. महाराष्ट्रातल्या कला केन्द्राचे ऑडिट करायची वेळ आली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली, कोणा एकाचा संसार उध्वस्त होणार असेल तर मग, अशी कला केन्द्र मनोरंजन करतात की, मनोभंजन ? या कडे तटस्थ नजरेतून पाहण्याची गरज आहे. बघा, पटतंय का ?
सुभाष सुतार,पत्रकार
गेवराई-बीड






