स्त्री अस्तित्वाच्या खुणा – कायद्याने बंड करणारी आधुनिक स्त्री..!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत, गेवराई [बीड] येथील नावाजलेल्या आर.बी. अट्टल महाविद्यालयात दोन दिवसाचा युवा महोत्सव खेळीमेळीच्या उत्साहात पार पडला.
बीड जिल्ह्य़ातून आलेल्या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले उपजत कलागुणांचे भन्नाट सादरीकरण करून, रंगमंचावर धमाल उडवून दिली. लोकरंगात न्हाऊन निघालेल्या व्यासपीठांनी लक्ष वेधून घेतले. गोदावरी सभागृहाच्या रंगमंचावर, विविध महाविद्यालयाच्या टीमने
नाटक, मुक अभिनय, करंट प्रहसनाच्या माध्यमातून अनेक विषय मांडले. विशेष म्हणजे, अनुभवी, नवख्या कलाकारांनी समकालीन विषयांना हात घालून, बेमालूम पणे समाजाच्या उणिवांवर बोट ठेवले. सकल समाजाच्या जडणघडणीत अशा नाटकांचा सहभाग महत्त्वाचा भाग राहीला आहे. त्यामुळे, त्या सर्वांचे कौतुकच केले पाहिजे.
गेवराई चे भूमिपुत्र आणि केसरबाई क्षीरसागर महाविद्यालयाचे नाट्यशास्त्रा विभागाचे प्रा. असलम शेख यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आत काय जळतय, या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावला. कारागृहातला कैदी हा विषय ऐरणीवर आणून, त्यांनी काही प्रश्न मांडले आहेत. आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा चिंतनशील विषय मांडला आहे.
पहिले पारितोषिक तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सावी ,या एकांकिकेला मिळाले. सावी ने गहण विषयाला धरून नवा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला.
खर म्हणजे, ज्यांनी ज्यांनी रंगमंचावर सादरीकरण केले. ते सर्वच विद्यार्थ्यी विजयी झालेत. नंबर, हा औपचारिकेता भाग असला पाहिजे. काही चेहरे बुजरे – बुजरे दिसले. ते रंगमंचावर आले. मात्र, त्यांचा काॅन्फिडन्स खचाखच भरलेल्या सभागृहाने हिरावून घेतला. जवळपास सगळ्या रंगमंचावर हे चित्र दिसून आले. वकृत्व, नृत्य, पाश्चात्य संगीत, गवळण, भारतीय संगीत इ. विषयावर सादरीकरण करताना अनेक कलाकार अडखळले. पण, हरकत नाही.
स्टेज वर उभे राहून, संवादफेक म्हणजे तारेवरची कसरत असते. ते तर खरे आहेच. पण, जोपर्यंत आपण जिंकणार नाही तोपर्यंत पाय रोवून उभे राहावे, एवढी मानसिकता कलाकाराने ठेवलीच पाहिजे.
परफेक्ट टायमिंग, जबरदस्त सराव आणि त्यातून सादर झालेला अभिनय, हे यशाचे गमक आहे. लोककलेचा उत्तम नमुना म्हणून नाट्य कलाकृती किंवा नाटकाकडे पाहिले जाते. मार्शल मॅकलूहान नावाच्या माध्यम भाष्यकाराने, माध्यमाचे दोन भाग पाडले. ते म्हणायचे, नाटक हे उष्ण [गरम] माध्यम आहे. या अर्थाने, एखादी एकांकिका लक्षपूर्वक पाहिली तरच ती कळते. ते भावते, त्यातला नेमका मतितार्थ लक्षात राहतो.
युवा महोत्सवात सादरीकरण झालेल्या एकांकिका खुपच छान होत्या. सावी, लेखकाचा कुत्रा, स्त्री अस्तित्वाच्या खुणा, राजकारणाचा बाजार, ऑपरेशन सिंदूर इ. एकांकिकेने छान सादरीकरण केले. चांगला आशय मांडला.अशी अनेक चांगला विषय मांडणारी कलाकृती सादर करण्यात आली.
आर. बी. अट्टल महाविद्यालयाच्या भूमिपुत्रांनी, स्त्री अस्तित्वाच्या खुणा..! या नावाची एकांकिका सादर करून, लक्ष वेधले. अल्पावधीतच या एकांकिकेच सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे,जीवाभावाच्या मित्र-मैत्रीणींनी एकत्र येऊन, त्यांनी हा विषय चपखल पणे मांडण्याचे धाडस केले. त्या सर्व टीमचे कौतुक आहे.
र.भ. अट्टल महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. सदाफुले ,युवा रंगकर्मी दिपक गिरी यांनी मार्गदर्शन केले आहे. नव्या पिढीला शक्य होईल तेवढी मदत करण्याकडे दिपक यांचा नेहमीच कल राहीला आहे.
युवा महोत्सवातले नियम काटेकोर पणे पाळावे लागतात. आठ मिनिटात सुरूवात आणि शेवट करावा लागतो. आपला विषय तेवढ्या वेळेत मांडावा लागतो. हे कसब असते. सरावाने ते सहज शक्य असते.
भारतीय रंगभूमीने, भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले आहे. लोकांची सुखे – दुखे ,त्यांच्या जगण्याच्या संकल्पना नाटकातून मांडल्या आहेत. प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले आहे. नव्या जाणिवेतून नव्यांचा विचार स्वतःच करावा, या दृष्टिकोनातून समकालीन विषयांना स्पर्श केला आहे. या अर्थाने, गेवराई च्या
युवा महोत्सवात एकांकिकेने धमाल उडवून दिली. प्रेक्षकांनी सगळ्यांना दाद दिली. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते.
रंगदेवता आणि नाट्य देवतेला विनम्र अभिवादन करून…सादर करीत आहोत. स्त्री अस्तित्वाचे खुणा…आणि नाटकाची होते सुरूवात..!
लेखक – दिग्दर्शक लक्षणी कैलास काबरा , कलाकार प्राची आरडे, सुभाष काळे, जयदीप कुटे, वैभव गिरी , शिवानी गुजर [आई ], जयश्री औटे , पुजा जाधव, सृष्टी जगताप [ मुलगी], दिशा सपकाळ [पत्रकार] इ. पात्र नाटकात दिसतात.
प्रकाश योजना- ओमकार आहेर, पार्श्वसंगीत – करण कुलकर्णी यांनी बसवले आहे.
या नाटकाची लेखिका लक्ष्मी काबरा यांनी नाटका विषयी बोलताना म्हणाली की, आपण नव्या युगात वावरतोय. मात्र, अजूनही स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. कुटुंबाचा ही नाही आणि समाजाचा सुद्धा नाही. पुरुषी अहंकार, ती बुरसटलेली मानसिकता, पितृ-सत्ताक पद्धतीने तिला आणखीन मर्यादित ठेवले आहे. हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिची स्वतःची स्वप्ने, तिचं काही तरी म्हणणं असतच ना, त्या कडे का दूर्लक्ष करायचे ? तिला ही मर्यादा कळतात. चांगले वाईट कळते. खोटा मुखवटा तिच्या अस्तित्वाला अडचणी निर्माण करतो. अवेळी लग्न करून, काय साध्य करायचे आहे. मुलगा दिसायला हिरोच असतो. परंतु, नंतर त्याचे खरे रूप उघडे नागडे पडते. या गोष्टीला जबाबदार कोण ? असा सवाल कु. काबरा हिने एकांकिकेतून समाज व्यवस्थेला विचारला आहे. सगळ्याच कलाकारांनी चांगली पात्र उभी केली आहे. सृष्टी जगताप [मुलगी ] हिने केलेला अभिनय लक्षात राहतो. माझ्या अस्तित्वाचे काय ? माझा काही दोष नसताना नवर्याने हाकलून दिले. आता, माझ्या लहान बाळासह मी एकटीने कुठे जावे ? मला न्याय हवाय ? या गंभीर प्रश्नावर सृष्टीने शेवट केलाय. खचाखच भरलेला प्रेक्षक वर्ग तिच्या संवेदना ऐकून घेतो. सभागृहात पीन ड्राॅप सायलेंट सन्नाटा पसरतो आणि नाटकाचा प्रयोग संपतो.
सर्वच कलाकारांनी या एकांकिकेच्या माध्यमातून छान आशय, चांगला संदेश दिला आहे.खर म्हणजे, अशी चांगली मांडणी करणाऱ्या कलाकृतीचे आपल्याच शहरात सादरीकरण व्हावे म्हणून, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जबाबदारी घेतली पाहिजे. अशी अपेक्षा आहे. राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे, रंगमंचावरची लोककला उपेक्षित राहते. आपल्याच माणसांचे आपण कौतुक करायला हवे की नाही.
खरय की नाही ?
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






