गेवराई – बीड : गेवराई मतदारसंघात असलेल्या नांदूर हवली व खामगावला पाण्याचा वेढा पडल्याने, जवळच असलेल्या दिंडे वस्तीवरची दहा बारा माणसे अडकली आहेत. एकजण झाडावर चढून बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, बीड जिल्ह्य़ात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, बीड जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. विद्यमान आमदार विजय राजे पंडित, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व एनडीआरएफ ची एक टीम , नगर परिषद गेवराई चे कर्मचारी गावात ठाण मांडून आहेत. गेवराई चे युवा नेते बाळराजे पवार हे सुद्धा नांदूर हवेली गावाच्या नव्या वस्तीवर ठाण मांडून आहेत. तहसीलदार शेळके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, त्यांनी माहिती घेतली. दरम्यान,
गावाला सुरक्षित बाहेर काढा, अशी मागणी होऊ लागली असून ; वस्तीवर अडकलेले लोक जीव मुठीत धरून बसलेत. त्यांना कसे बाहेर काढायचे, असा प्रश्न पडला आहे. तहसीलदार शेळके यांनी सदरील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, सोमवार ता. 22 रोजी सायंकाळपर्यंत गाव आणि वस्तीवर अडकलेल्या नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, रात्र झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 7 वाजता बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन नांदूर हवली येथे पोहचले होते.






