गेवराई – बीड  – सुभाष सुतार – 
     आम्ही पाचजण कसे वाचलो. मला अचानक कशी जाग आली. काहीच समजले नाही. बरोबर दोन वाजता पाणी घरात घुसले. माझ्या पायाला काही तरी गार लागले. तेवढ्यात मी दचकून उठलो आणि…..!
परमपूज्य जगदानंद महाराज, उमादेवीच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब कठीण प्रसंगातून वाचले आहे. प्रमोद मुळे देवा यांनी घडलेल्या प्रसंगाची आपबीती सांगितली अन अंगावर रोमांच उभे राहीले…!
 परतीच्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने अक्षरश: थैमान घातले. शेत पिकांना, गावांना, घरांना पुराचा वेढा पडला. माणसांचे जीव धोक्यात आले. या जिवांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ ची टीम जिवावर उदार होऊन धडपडत होती. असाच बाका प्रसंग उमापूर ता.गेवराई जि.बीड येथील मुळे कुटुंबावर आला होता. ते पाच जीव कसे वाचले.
या विचाराने अजूनही गावाला धडकीच भरते. त्या रात्री नेमके काय झाले. मुळे कुटुंबातील ते पाच सदस्य मृत्युच्या दाढेतून कसे वाचले ? या प्रसंगाचा थरारक अनुभव प्रमोद [ देवा ] मुळे यांनी सांगितला आहे.
     22 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभर पाऊस येत, जात होता. सूर्यदर्शन होत नव्हते. ढगाळ वातावरणाने आसमंत काळवंडले होते. त्याच दिवशी, 
मध्यरात्री पावसाला पून्हा सुरुवात झाली होती. अचानक पावसाचा जोर वाढला होता. मात्र, पंचवीस – तीस वर्षात घरात कधीच पाणी आले नव्हते. त्यामुळे, आम्ही सगळेच जेवण करून झोपी गेलो होतो. मुळे देवा सांगत होते.
मध्यरात्री बरोबर दोन वाजता माझ्या पायाजवळ पाण्याचा लोंढा आला. अचानक जाग आली.
मी, दचकून उठलो आणि पाहिले. तर, पाणी घरात शिरले होते. घाईघाईत कौस्तुभला उठवले. मोठ्याने पत्नीला आवाज दिला. आम्ही सगळेच जागे झालोत. धो..धो.. पाऊस सुरू होता. हळूहळू पाणी घरात वाढत होते. काय करावे कळेना, छोटी नात आणि मुलीला पलंगावर बसून रहा म्हणून सांगितले.
पाच दहा मिनिटात पाण्याने दोन्ही बाजूने वेढा घातला. त्या तिघींना सांगितले की, तुम्ही शेजारी भावाच्या घरी जा, मी आणि कौस्तुभ घरातच थांबतोत. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्याने, आम्ही सगळ्यांनीच घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागच्या बाजुने दार उघडून पाहिले तर, त्या दरवाजातून ही पाणी आत घुसले. अतिशय कठीण परिस्थिती उभी राहीली. पावसाचा जोर जास्त असल्याने आवाज दिला तरी ऐकू जात नव्हता. त्याच अवस्थेत गुडघा भर पाण्यातून भिंतीच्या कडेने वाट काढून आम्ही सुखरूप घरा बाहेर पडलोत.
सकाळी घरात प्रवेश करून पाहिले. घराच्या चार ही रूम मध्ये पाच – सहा फूट पाणी होते. घरात सर्वत्र गाळ साचला होता. पुस्तकाचे कपाट, आलमारी, फ्रिज, इन्व्हर्टर, , कपड्याचे दोन कपाट, गव्हाचे, ज्वारीचे पोते, संसारोपयोगी साहित्य, पंचवीस हजाराची रोख रक्कम, सोन्याचे एक नेकलेस पाण्यात वाहून गेले. 
मी , बराच वेळ एकाच घरात एकाच ठिकाणी बसून एकटक पाहत होतो. घरातल्या सगळ्या वस्तू पाण्यात बुडाल्या होत्या. काहीच सुचत नव्हते. पत्नी आणि मुलांनी समजूत काढली. पत्नी सविता हिने, तुम्ही बिलकुल खचू नका. मोडून पडलेला संसार पून्हा उभा करू, जगदानंद महाराजांच्या कृपेने आपण सगळे सुखरूप आहोत. घटना माहित झाल्यानंतर, उमापूर च्या नागरीकांनी मुळे कुटुंबाला धीर दिला. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रांनी संवेदनशीलता दाखवली. पाठीवर हात ठेवून, धीर दिलाय…! काळ आला होता. पण, वेळ आली नव्हती. सविता मुळे काकू, प्रमोद देवा, डॉक्टर कौस्तुभ, डॉक्टर रूचिरा, तिची एक अडीच वर्षाची मुलगी, या भयंकर संकटातून बाहेर आलेत. दैव बलवत्तर म्हणून,चांगल्या कर्माला इश्वराने तारले आहे.
			





