गेवराई – बीड :
जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच, गट आणि गटातल्या गणिताची जुळवाजुळव करायला सुरूवात झाली आहे.
दिवाळीनंतर निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होणार आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा आहेत. सात जागा सर्व साधारण गटाला सुटल्या आहेत. त्यापैकी तीन जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. दोन जागा ओबीसी पुरूष व महिला गटासाठी सुटल्यात. राखीव गटाला एक ही जागा नाही. त्यामुळे, दलित चळवळीत काम करणाऱ्या युवा नेत्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. हक्काचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने, पुढाऱ्यांना सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात धावाधाव करावी लागणार आहे.
गेवराई तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात पंडिताच्या दोन गटाचा वरचष्मा राहीला आहे. उमापूर, चकलांबा, धोंडराई, मादळमोही सिरसदेवी गटाचे नेतृत्व माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, विद्यमान आमदार विजय राजे पंडित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती युद्धाजीत पंडित यांनी केलेले आहे. 
पंडितांची तिसरी पिढी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सक्रिय होईल, अशी चर्चा आहे. या माध्यमातून रणवीर अमरसिंह पंडित, यशराज बदामराव पंडित यांना नेतृत्व करण्याची संधी आहे.
परंतु, पंडितांना साथ देणारे हक्काचे मतदारसंघ अन्य प्रवर्गासाठी राखीव झालेत. धोंडराई, उमापूर गट अनुक्रमे
सर्व साधारण महिला आणि ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटला आहे. चकलांबा गट ओबीसीला गेला आहे. त्यामुळे, पंडितांचा वारसा सांभाळू पाहणार्या युवा नेतृत्वासाठी सुरक्षित मतदारसंघाची शोधाशोध करावी लागणार आहे.
 गेवराई तालुक्यातील तलवडा, जातेगाव आणि पाडळसिंगी गट, पाहिजे तेवढा सेफ  नाही. तलवडा मतदारसंघात पंडितांचा पराभव झाला होता. तिथे ॲड. सुरेश हात्ते निवडून आले होते. गढी गट माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मानणारा मतदारसंघ आहे. मात्र, तिथे रिस्क घ्यायची की, जातेगाव मतदारसंघाला जवळ करायचे याची चाचपणी केली जात आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव यशराज पंडित यांना पंचायत समिती गणात उभे करून नेतृत्व द्यायचे आणि एका गटात युद्धाजीत पंडित यांना उभे करायचे. असा, ही एक मतप्रवाह चर्चेत आहे. 
 गेल्या दहा वर्षापासून गेवराचे पाटील बाळराजे पवार यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतली. त्यांचे बंधू ॲड. लक्ष्मणराव पवार दहा वर्ष आमदार राहीलेत. मात्र, त्यांच्या घरातून कोणीही ग्रामीण भागात निवडणुक लढविली नाही. त्यांच्याकडे ,गेल्या पंधरा वर्षांपासून 
गेवराई नगर परिषदेची सत्ता आहे. या माध्यमातून, ॲड. लक्ष्मण पवार,
सौ. गिता भाभी पवार यांनी नप सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. पवारांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. शिवराज बाळराजे पवार गेवराई नगर परिषदेच्या सभागृहात जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या संदर्भात बाळराजे पवार निर्णय घेतील. नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीत, गेवराई चे नगराध्यक्ष पद सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, पवारांच्या घरातूनच उमेदवार राहील, असे राजकीय जाणकारांना वाटते.
गेवराई तालुक्यातील नऊ पैकी एक ही गट राखीव झाला नाही. उमापूर किंवा धोंडराई मतदारसंघ राखीव राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे, दलित चळवळीत सक्रिय काम करणाऱ्या युवा नेतृत्वाला संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्या दृष्टीकोनातून, अनेक इच्छुक ग्रामीण भागात संपर्क ठेवून होते. मात्र, सर्व संभाव्य इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. कोणताही जिल्हा परिषद गट राखीव झाला नसल्याने, त्यांना धक्काच बसला आहे. 
जातेगाव, तलवडा, गढी आणि पाडळसिंगी हे चार गटा पैकी एक मतदारसंघ पंडितांच्या युवा पिढीला चाॅईस करावा लागणार आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे चिरंजीव रणवीर पंडित कोणत्या गटातून लढतील या विषयी तर्क लावले जात आहेत. ते जातेगाव किंवा गढीतून लढतील, माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव यशराज तलवडा किंवा पाडळसिंगी मतदारसंघातून नशीब आजमावून पाहतील. असे , त्यांच्या समर्थकांना वाटते. विशेष म्हणजे, माजी परिषद सभापती युद्धाजीत पंडित निवडणुक लढतील की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
[ पडघम निवडणुकीचे – सुभाष सुतार ]
[ अपूर्ण…]
			





