गेवराई – बीड : गेवराई नगर परिषद , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात लढा उभारून, शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणुक लढविणार असून, गोरगरीब समाजातील घटकांसाठी लढणाऱ्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहून पक्षाची ताकद दाखवू , असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अजय दाभाडे यांनी येथे केले.
गेवराई शहरात गुरूवार ता. 6 रोजी संपर्क प्रमुख परशुराम जाधव, जिल्हा प्रमुख विलास भैय्या गिराम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर किरण सुतार, साईनाथ सुतार, संतोष नवले, जम्मू सय्यद, जलील पठाण, विशाल घोडे, परशुराम बजगुडे, अफसर शेख यांची उपस्थिती होती.
अजय दाभाडे यांनी सांगितले की,
महा विकास आघाडी सोबत लढायची आमची तयारी आहे. नसता, स्वबळावर ताकदीने निवडणुक लढविणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बहुजन समाजातल्या गोरगरीब कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगर परिषद , जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व ताकदीने
मैदानात उतरणार आहे. गेवराई नगर परिषद आणि गेवराई तालुक्यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाभाडे यांनी व्यक्त केली आहे. गेवराई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणात शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेवराई तालुक्यातील मित्र पक्ष, त्याच बरोबर, सम विचारी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांशी आम्ही चर्चा करून, योग्य ठिकाणी महा आघाडीचे उमेदवार उभे त्यांना पूर्ण ताकद देणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ता.प्रमुख अजय दाभाडे यांनी दिली आहे.






